24.5 C
Gondiā
Tuesday, August 25, 2026
Home महाराष्ट्र मुंबई विद्यापीठाचे प्रा. अ.का. प्रियोळकर स्मृती पारितोषिक जाहीर

मुंबई विद्यापीठाचे प्रा. अ.का. प्रियोळकर स्मृती पारितोषिक जाहीर

0
19

मुंबई, दि. १२ जानेवारी: कै. प्रा. अ. का. प्रियोळकर स्मृती पारितोषिक समितीने २०२२- २३ या वर्षातील कै. अ. का. प्रियोळकर ज्येष्ठ संशोधक पुरस्कारासाठी डॉ. सुधीर रसाळ यांची निवड केली आहे. कै. अ.का प्रियोळकर यांच्या कुटुंबीयांनी मुंबई विद्यापीठाकडे ‘कै. अ. का. प्रियोळकर स्मृती पारितोषिक’ या अभिधानाखाली देणगी म्हणून दिलेल्या रकमेच्या वार्षिक व्याजातून गेल्या २६ वर्षापासून ज्येष्ठ संशोधक आणि मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग संशोधन केंद्रातील विद्यार्थ्याला ‘सर्वोत्कृष्ट पीएच.डी प्रबंध’ असे पुरस्कार मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्यावतीने दरवर्षी दिले जातात. या वर्षीचा कै. अ.का प्रियोळकर पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना प्रदान करण्यात येत आहे.

डॉ. सुधीर रसाळ हे एक कृतीशील प्राध्यापक म्हणून परिचित आहेत. त्याचबरोबर त्यांनी मराठी वाङ्मयाची, मुख्यत: कवितेची केलेली समीक्षा आधुनिक मराठी कवितेच्या अभ्यासासाठी दिशादर्शक आहे. कविता आणि प्रतिमा, कवितानिरूपणे, काही मराठी कवी: जाणिवा आणि शैली, ना. घ. देशपांडे यांची कविता, मर्ढेकरांची कविता : आकलन आणि विश्लेषण, मर्ढेकरांची कविता : जाणिवांचे अंतःस्वरूप, मर्ढेकरांचे कथात्म आणि नाट्यात्म वाङ्मय, वाङ्मयीन संस्कृती, समीक्षक भालचंद्र नेमाडे यासारख्या महत्त्वपूर्ण संशोधनपर समीक्षणात्मक ग्रंथांची निर्मिती करून डॉ. सुधीर रसाळ यांनी मराठी संशोधन आणि समीक्षेचे दालन समृद्ध केले आहे. आपल्या या मौलिक लेखनाची, संशोधनाची आणि सतत संशोधनात रमणाऱ्या वृत्तीची दखल घेऊन कै. प्रा. अ. का प्रियोळकर स्मृती पुरस्कार समितीने ज्येष्ठ संशोधक अ.का. प्रियोळकर पुरस्कारासाठी डॉ. सुधीर रसाळ यांची एकमताने निवड केली आहे.

त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट पीएच.डी. प्रबंध पुरस्कार डॉ. शरद मोहन पाटील यांच्या  ‘क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावरील चरित्रपर लेखनाचा चिकित्सक अभ्यास’ या प्रबंधाला प्राप्त झाला आहे. हे पुरस्कार मराठी भाषादिनाच्या दिवशी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदान करण्यात येणार असल्याचे मराठी विभाग प्रमुख प्रा. वंदना महाजन यांनी सांगितले