
लाखनीP नगर रचना कार्यालय व महसूल विभागातील शासकीय कर्मचार्यांच्या संगनमताने बनावट शिक्के तयार करून संबंधित अधिकार्याची खोटी स्वाक्षरी घेऊन जावक रेकॉर्डमध्ये पत्र निर्गमित केल्याचे बनावट शिफारस पत्राचे आधारे शेतजमिनी निवासी प्रयोजनार्थ अकृषक आदेश पारित करून शासनाची १ कोटी ९0 लाख ७२ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अरुण माधोराव मोटघरे, शारदा अरुण मोटघरे रा. लाखनी, शेतकरी दिलीप काशिनाथ चोले रा. मुरमाडी/सावरी, ओमशंकर पतीराम चेटूले रा. केसलवाडा/वाघ आणि नगररचना कार्यालय भंडाराचे कनिष्ठ लिपिक अशोक शंकर हटवार, वरिष्ठ लिपिक वृषाली अनिल बारई रा. भंडारा यांचेवर लाखनी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण मोटघरे आणि कुटुंबियांचे मागील अनेक वर्षापासून उपजाऊ शेतजमीन विकत घेणे व त्यावर ले-आऊट तयार करून प्लॉट पाडून विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी दिलीप काशिनाथ चोले व इतर ४ यांची मौजा मुरमाडी/सावरी येथील गट क्रमांक ३५८/१ आराजी 0.३९ हेक्टर आणि ओमशंकर पतीराम चेटूले यांची मौजा केसलवाडा/वाघ येथील गट क्रमांक ५४0/३ आराजी 0.९९ हेक्टरपैकी 0.४९.५0 हेक्टर शेतजमीन घेतली होती. पण जमीन मालकाकडून शेतजमिनीची रजिस्ट्री (नोंदणी) करून न घेता शेतकर्यांकडून जमिनीचा सौदा झाल्यानंतर आपण कायद्याचे कचाट्यात येऊ नये या हेतूने जमीन मालकाच्या नावाने निवासी प्रयोजनार्थ अकृषक करण्याकरिता उपविभागीय/तहसील कार्यालयात अर्ज केला. सदर शेतजमीन कृषी झोनमध्ये येत असल्याने नगररचनाकार कार्यालयाकडून अकृषक परवानगी मिळणे अशक्य असल्यामुळे भूमाफिया अरुण मोटघरे व शारदा मोटघरे यांनी शेतजमीन मालकाशी संगनमत करून नगररचना कार्यालय भंडारा येथील काही कर्मचार्यांना हाताशी धरत तात्पुरती/अंतिम मंजुरी असलेला बनावट शिफारस पत्र तयार करून घेतला. त्या आधारे निवासी प्रयोजनार्थ अकृषक आदेश पारित करून घेतला.
या प्रकाराने शासनाला अकृषकपासून प्राप्त होणार्या शासकीय महसुलाची चोरी करून १ कोटी ९0 लाख ७२ हजार रुपयाची शासनाची फसवणूक केली. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी चौकशी करुन अरुण मोटघरे, शारदा मोटघरे, शेतकरी दिलीप चोले, ओमशंकर चेटूले, नगररचना कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक अशोक हटवार व वरिष्ठ लिपिक वृषाली अनिल बारई यांचेवर ४0९, ४१८, ४२0, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७३ व ३४ भादंविअन्वये लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी तपास करीत आहेत. तपासात आरोपींची संख्या वाढून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.