अर्जुनी मोरगाव-शिस्त व संस्कृती संवर्धनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रेरणेतून राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात झाली. बॅरिस्टर महात्मा गांधीजी या देशात असणाऱ्या जातीव्यवस्थेने व्यथित होते. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातून जर जातीव्यवस्था नष्ट झाली नाही तर, या देशातील जनतेमध्ये बंधूभावना निर्माण होणार नाही; आणि त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी हे स्वातंत्र्य वांझोटे राहील, अशा प्रकारचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते, आणि या मताशी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी सहमत होते. जातीव्यवस्था हा देशाला लागलेला शाप आहे. जातीभेद नष्ट झाला पाहिजे, हे ध्येय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे होते. प्रेमाने मन जिंकता येते आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे प्रतिपादन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. ते निमगाव येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय विशेष शिबिरात उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. “युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास” ही संकल्पना जर आपल्याला प्रत्यक्षात आणायची असेल तर देशातील जनतेने पहिल्यांदा नागरिक होणे महत्त्वाचे आहे आणि हे काम राष्ट्रीय सेवा योजना करते असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सोपानदेव पिसे, संचालक राष्ट्रीय सेवा योजना, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी सामाजिक दायित्वाची जाणीव आपल्याला देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करते. आपण देशाला काही देणे लागतो. आपल्याजवळ असलेल्या त्रोटक संसाधनाचा वापर आपण केला पाहिजे. आपले प्रश्न यातूनच सोडविले पाहिजे. मार्ग प्रशस्त केला पाहिजे; आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आपल्याजवळ असलेले पोटेन्शिअल वापरले पाहिजे. असे महत्त्वपूर्ण विचार डॉ. सोपानदेव पिसे यांनी मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुरले यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही समाजसेवेसाठी युवकांची चळवळ आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून राष्ट्र विकास साधता येतो, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. राज्यस्तरीय शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी गावच्या सरपंच सौ. बंदेश्वरी राऊत यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रकल्प निमगावात यशस्वी होण्यासाठी सर्व गावकरी आपल्या पाठीशी राहतील असे आश्वासन दिले. याप्रसंगी डॉ. पांडुरंग डांगे, सिनेट सदस्य रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर, ओमप्रकाश पवार, मुख्याध्यापक श्याम माध्यमिक बहुउद्देशीय विद्यालय यांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष लुणकरन चितलांगे यांनी सर्व शिबिरार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन कार्यक्रमाला मुकेश जायस्वाल सचिव दुर्गा शिक्षण संस्था अर्जुनी /मोर, उपसरपंच, संदीप पुस्तोडे, वर्षाताई गेडाम, मिलिंद मेश्राम ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, बी.एम. ब्राह्मणकर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, संतोष परमार ग्रामसेवक, माजी सरपंच विश्वनाथ बाळबुद्धे हे प्रामुख्याने उपस्थित होते. गावातील वेगवेगळ्या समित्यांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिर प्रमुख डॉ. एम.आर.दर्वे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. बी. एम. राठोड यांनी तर आभार प्रदर्शन शिबिर संयोजक डॉ. प्रदीप भानसे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. कैलास लोखंडे, प्रा. राजेश डोंगरवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व शिबिरार्थी यांनी अतिशय परिश्रम घेतले.