
अमरावती : राज्यसेवा परीक्षेसाठी आयोगाने लागू केलेला लेखी पॅटर्न हा २०२५ नंतर लागू व्हावा या व आदी मागण्यांसाठी आज ‘एमपीएससी’च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. पुण्यातील विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यापासून रोखल्याबद्दल विद्यार्थ्यांनी यावेळी सरकारचा निषेध नोंदविला.
राज्यसेवा परिक्षेसाठी जो लेखी पॅटर्न आयोगाने लागू केला तो पॅटर्न २०२५ नंतर लागू व्हावा, आता घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा या जुन्या वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात याव्यात, जुनाच पॅटर्न २०२५ पर्यंत कायम ठेवण्यात यावा, या आमच्या मागण्या आहेत. सरकारने या मागण्यांची तत्काळ दखल घ्यावी, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.शुक्रवारी दुपारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. राज्य सरकारने आश्वासन देऊन सुद्धा मागण्या पूर्ण न केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. तातडीने सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.