चंद्रपूर बाजार समितीत भाजप-काँग्रेस
चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप- काँग्रेस या अनोख्या युतीचा विजय झाला तर, काँग्रेस खासदार बाळू धानोरकर समर्थित माजी सभापती दिनेश चोखारे गटाचा पराभव झाला आहे. एकूण १८ संचालक असलेल्या या बाजार समितीत भाजप-काँग्रेस युतीचे १२ तर काँग्रेस चोखारे गटाचे ६ संचालक विजयी झाले आहे.
चंद्रपूर बाजार समितीची निवडणूक अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. या चर्चेचे कारणही तसेच आहे. देशात आजवर कुठेही झाली नाही, अशी भाजप-काँग्रेसची युती या बाजार समितीच्या निवडणुकीत बघायला मिळाली. यामध्ये भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे तथा माजी खासदार नरेश पुगलिया गटाचे संचालक एकत्र आले होते. भाजप व काँग्रेस युतीला आजी-माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार यांचा आशीर्वाद होताच. पक्षाच्या निवडणूक चिन्हावर ही निवडणूक लढल्या जात नाही, असा युक्तिवाद भाजप व काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडून केला जात असला तरी एकत्र बैठका घेत निवडणूक प्रचाराची यंत्रणाही एकत्रीतरित्या राबवण्यात आली. त्याचा परिणाम भाजप-काँग्रेस युतीचे एकूण १२ संचालक विजयी झाले तर काँग्रेसच्या दिनेश चोखारे गटाचे सहा संचालक विजयी झाले. विशेष म्हणजे, चोखारे यांना काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा आशीर्वाद होता. तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व कृऊबाचे माजी सभापती मनोहर पाऊणकर यांची साथ होती. सलग पाच वर्ष सभापतीपद भूषविल्यानंतरही चोखारे यांना येथे नाराजीमुळे पराभवाचा फटका बसला. चोखारे गटातून स्वत: दिनेश चोखारे व युवा कार्यकर्ते अजय बलकी निवडून आले आहेत.
ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या 147 बाजार समित्यांमध्ये मतदारांचा कौल नक्की कोणाला हे आज स्पष्ट होणार आहे. 95 बाजार समित्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून मतदारांनी कोणाला कौल दिला आहे. हे आज स्पष्ट होणार आहे.दरम्यान, अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप, शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पहायला मिळत आहे.
सातार्यात रविवारी मतदान
– सातारा जिल्ह्यातील आठ बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. प्रचाराच्या निमित्ताने गेली आठ दिवस आरोप-प्रत्यारोंचा धुरळा उडाला. स्थानिक राजकीय संदर्भ लक्षात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे, ठाकरे गट) आणि भाजप हे पक्ष आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याने मतदारांचा भाव वधारला आहे. कराडमधील काही मतदार हैदराबाद, सहलीवर गेले आहेत.
शिवेंद्रसिंहराजेंचे पॅनल विजयी
– जावळी-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील व शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय मिळवला.
हर्षवर्धन जाधवांना धक्का
– छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना धक्का. हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव आणि शिंदे गटाचे नितीन पाटील यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनलने पंधरा पैकी पंधरा जागा जिंकत मारली बाजी.
जयंत पाटलांनी गड राखला
– सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. इस्लापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा गड आहे. तर विटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि काँग्रेस आघाडीच्या पॅनलने विजय मिळवला आहे.
पंकजा मुंडेंना धक्का, धनंजय मुंडेंचा विजय
– बीडमधील परळी आणि अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे पुन्हा आमने-सामने आले होते. मात्र, या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. अंबाजोगाई बाजार समितीत 18 पैकी 15 जागांवर धनंजय मुंडे यांचे समर्थक उमेदवार विजयी झाले आहे. दणदणीत विजय मिळवून धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली आहे. महाविकास आघाडीचा हा मोठा विजय झाले. तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना अवघ्या तीनच जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासोबतच भाजपलाही हा मोठा धक्का आहे. भाजपने ही निवडणूक पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात लढली होती.
– दुसरीकडे, परळी बाजार समितीत धनंजय मुंडे यांचे 14 उमेदवार आघाडीवर आहेत. तर, पंकजा मुंडे यांचा एकच उमदेवार आघाडीवर आहे. परळी बाजार समितीही धनंजय मुंडे यांच्या ताब्यात जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बीडमधील या दोन्ही महत्त्वाच्या बाजार समितीवर आता मविआचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
छगन भुजबळ यांचे वर्चस्व
– येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 13 जागा मिळवीत दोन अपक्षांसह एकूण 15 जागांवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी. तर आमदार दराडे गटाला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत. येवला विधानसभा मतदारसंघात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छगन भुजबळ यांच्या शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप-शिंदे गटाची बाजी
– छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण 15 पैकी 11 जागा भाजप-शिंदे गटाच्या खिशात गेल्या आहेत. महाविकास आघाडीला फक्त 4 जागांवर विजय मिळवता आल्याने मविआला हा धक्का समजला जात आहे.
एकनाथ खडसे यांना भुसावळमध्ये धक्का
– भुसावळ कृषी उत्पन्न समिती भाजपच्या ताब्यात
तिवसा बाजार समितीत महाविकास आघाडीचा एकतर्फी विजय
– अमरावतीत तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रणित सहकार पॅनलचा १८ पैकी १८ जागांवर एकतर्फी विजय झाला आहे. काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मविआने या निवडणुकीत बाजी मारली आहे.
थोरातांच्या पॅनलने उघडले खाते
– अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर बाजार समितीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलने खाते उघडले आहे. एकूण 18 जागांपैकी चार जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात बाळासाहेब थोरातांच्या शेतकरी विकास मंडळाने खाते उघडले असून चारही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत.
– महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पॅनल पिछाडीवर. तिसऱ्या फेरीतही महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी. विखे गटाला अद्याप एकही जागा मिळालेली नाही
दिग्रस बाजार समितीत ठाकरेंचा शिंदे गटाला धक्का
– शिवसेनेचे नेते आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना आपल्याच होमग्राऊंडमध्ये धक्का बसला आहे. ठाकरे गटाने संजय राठोड यांच्या समितीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.
पुण्यात खेड बाजारसमितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय
– पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विरोधकांना चितपट करत खेड बाजार समितीवर झेंडा लावला.
नाशिकच्या देवळा बाजार समितीवर राष्ट्रवादी आणि भाजपचा झेंडा
– देवळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सर्व समावेशक पॅनलची निर्मिती केली होती. या देवळ्यात भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर आणि राष्ट्रवादीचे योगेश आहेत यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनलची सरशी झाली. यापूर्वी या पॅनलच्या 8 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. आज झालेल्या 10 जागांपैकी 9 जागांवर विजय मिळवला.
मोशी बाजार समितीत भाजपला धक्का
– अमरावतीच्या मोर्शी बाजार समितीत भाजप खासदार डॉ अनिल बोंडे यांना धक्का बसला आहे. मोर्शीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी झाले असून भाजपचे 8 उमेदवार विजयी झाले आहेत.
लातूर बाजार समितीवर काँग्रेस
– भाजप आमदार रमेश कराड यांनी लातूर कृषी बाजार उत्पन्न समितीच्या निवडणूकीत काँग्रेसला मोठे आव्हान दिल्यानंतर भाजपमधील राजकारण चांगलेच तापले होते.18 जागा खेचत काँग्रेसने एकहाती विजय मिळवला आहे.
पालघर समितीवर महाविकास आघाडी
– पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे. 17 पैकी 17 जागा जिंकत मविआने वर्चस्व प्राप्त केले. आज झालेल्या व्यापारी अडते निवडणूकीत मविआचे दोन उमेदवार निवडणून आले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपला पालघर बाजार समितीत एकही जागा मिळवता आली नाही.
नांदेडमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
– जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपैकी नायगाव बाजार समिती बिनविरोध झाली. उर्वरित चार बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (२८ एप्रिल) शांततेत मतदान झाले. यंदाच्या वेळी मतांचा पाऊस पडला आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाला मार्केट यार्डमध्ये आणणार आणि कोणाला बाहेर काढणार? हे ३० एप्रिलला मतमाेजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागांसाठी मतदान झाले. तीन हजार ५५३ पैकी तीन हजार ४६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ९७.५५ टक्के आहे. काही मतदान केंद्रावर तर शंभर टक्के मतदान झाले आहे. ही मतदान प्रक्रिया नांदेड, अर्धापूर, मुदखेड या तीन तालुक्यातील १३ मतदान केंद्रावर शांततेत पार पडली आहे. महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनल व भाजपा सेना प्रणित परिवर्तन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दोन नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई आहे. हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जतनबाई शेखावत शासकीय आश्रमशाळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे नागरिकांचेही लक्ष लागले आहे.





