मासिक सभेत सदस्यांना धमकी : भाजप महामंत्र्यांचा कारनामा

0
13

सडक अर्जुनी : ग्राम कोदामेडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा सुरू असताना सरपंच पतींनी सदस्याला धमकावणी दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.११) घडला. मंत्र्यांचा पुतण्या असल्याचा धाक दाखवून या महोदयांनी सदस्यांना कोंडण्याचाही प्रयत्न केला. यावर सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन दिले असून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सरपंच अनिता बडोले यांनी बोलविलेल्या सभेनुसार सभेचे कामकाज सुरू होते. सभेत सिमेंट रस्ता व सभामंडपाच्या कामाचे बील काढण्यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य निशांत राऊत यांनी विचारणा केली असता सरपंच पती व भारतीय जनता पक्षाचे महामंत्री परमानंद बडोले सभेत आले. तेथे त्यांनी दोन्ही कामांचे बील काढा असे ग्रामसचिवांना सांगत सदस्य राऊत व अन्य तीन सदस्यांना बील काढण्यासाठी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.
एवढेच नव्हे तर त्यांनी, मंत्र्यांचा पुतन्या व भाजपचा महामंत्री असल्याचा धाक दाखवित चिरून टाकण्याची धमकी दिली व सचिवांसह सदस्यांना कोंडण्याचा प्रयत्न केल्याचे निवेदनात नमूद आहे.
याकरिता सभेत शिरून शिवीगाळ व धमकावणी करणार्‍या परमानंद बडोले यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य राऊत, आनंदा झाडे, सुलोचना मुनिश्‍वर व प्रमिला मरसकोल्हे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन देऊन केली आहे.