35.5 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home गुन्हेवार्ता ट्रकने १२ वर्षीय मुलीला चिरडले

ट्रकने १२ वर्षीय मुलीला चिरडले

0
19

blank

चामोर्शी -तालुक्यातील आष्टी येथे आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून बारा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी(ता. १४) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडला. सोनाक्षी मसराम (१२ रा. नांदगाव फाटा ता. राजुरा जि.चंद्रपूर) असे मृतक मुलीचे नाव आहे. आज दुपारी मृतक मुलगी आपल्या मामासोबत दुचाकिने आष्टीवरून गोंडपिपरीकडे जात होती. रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोर दुचाकी घसरली. यात दुचाकीवरून मृतक मुलगी आणि तिचा मामा खाली पडले. एवढ्यात मागून येणाऱ्या ट्रकने सोनाक्षीला चिरडले. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह फरार झाला. सदर ट्रक हा सूरजागड येथून लोह खनिजाची वाहतूक करणारा असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे. फरार ट्रकचालकाचा पत्ता लागला असून त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिली. मागील दीड वर्षांपासून या मार्गावर सूरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची रेलचेल असते. त्यामुळे या मार्गावर कायम अपघात होत असतात. तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.