गोंदिया : विक्रीसाठी दुचाकीने गांजा घेऊन जात असताना पोलिसांनी तरुणाला पकडले. आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत कुंभारटोली ते जामखारी मार्गावर बुधवारी (दि.१२) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपी तरूणाकडून ८.३१० किलो गांजा व अन्य साहित्य जप्त केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी (दि.१२) आमगाव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक तरूण दुचाकीने गांजा विकण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने कुंभारटोली-जामखारी मार्गावर सापळा लावून मोठ्या शिताफीने दुचाकीने जात असलेल्या प्रमोद जितेन्द्र लक्षणे (२६, रा. झिलमीली) थांबविले. त्याच्याकडे दोन बॅग होत्या व त्यांची पाहणी केली असता त्यात हिरवी ओलसर पाने, फुले आणि बिया (शेंडे व बोंडे) मिश्रित ८.३१० किलो गांजा आढळला. पोलिसांनी प्रमोदला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील गांजा जप्त केला आहे. प्रकरणी आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रमोदच्या खांद्यावर एक बॅग होती व दुचाकी समोर एक बॅग ठेवली होती. त्या दोन्ही स्कूल बॅगमध्ये एकूण ८.३१० किलो हिरवा ओलसर गांजा किंमत आठ लाख ३१ हजार रूपये, दोन स्कुल बॅग अंदाजे किमत एक हजार रूपये, अवैध व्यवसाय करण्यासाठी वापरत असलेला अँड्रॉइड मोबाइल किंमत १० हजार रूपये एक पांढऱ्या रंगाची दुचाकी किंमत एक लाख रूपये असा एकूण नऊ लाख ४२ हजार रूपये किमतीचा माल जप्त केला आहे.





