गोळी झाडून दहशत माजविणाऱ्या आरोपीचा शोध न लावल्यास जिल्ह्यात आंदोलन करू- आ. विजय वडेट्टीवार

0
13

चंद्रपूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षावर झालेला भ्याड हल्ला निदंनीय असून राजकीय नेत्यावर गोळीबार करून जिल्ह्यात दहशत माजवणारी पहिलीच घटना आहे. त्यामुळे दहशत माजविणाऱ्या आरोपीसोबतच मास्टरमाईंडचा पोलिसांनी तातडीने छडा लावावा. अन्यथा जिल्हाभर आंदोलन उभारू, असा इशारा माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला.११ मे ला रात्री ९.२० वाजताचे सुमारास झालेल्या भ्याड हल्ल्यातून बचावलेले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीप्रसंगी आ. वडेट्टीवार बोलत होते. जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या राजकीय नेत्यावर हल्ला होण्याची पहिलीच घटना आहे. धार्मिक आणि सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या संतोषसिंह रावत यांचे जिल्ह्यात कोणाशीही वैयक्तिक वैर नाही, असे असताना त्यांच्यावर पाळत ठेवून गोळी झाडल्या जावी, ही घटना विकृत मानसिकतेचे द्योतक असल्याचे आ. वडेट्टीवार म्हणाले.संतोष रावत यांच्यावर भ्याड हल्ला होऊन तीन दिवस झाले, परंतु अद्यापपर्यंत हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. भविष्यात कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होवू नये म्हणून पोलीस विभागाने सदर प्रकरणाचा तपास करताना जात, धर्म, पक्ष आणि पद याची तमा न बाळगता आरोपींना पडद्यासमोर आणावे, अन्यथा सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जिल्हाभर निषेध सभा, रास्ता रोको आणि बंद पाडू. पहिली निषेध सभा स्थानिक गांधी चौकात घेण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.