
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी नुकताच आपला एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. आपल्या एका वर्षाचा कार्याचा आढावा देण्यासाठी पत्रकार परिषद देखील त्यांनी आयोजित केली होती. त्यांच्या कार्याचे वृत्त सगळीकडे पुस्तकाच्या रुपात मांडण्यासाठी त्यांनी ‘कार्यवृत्त पुस्तिका’ तयार केली असून त्याचे विमोचन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी तसेच मा. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपेंद्रजी कोठेकर, माजी मंत्री राजकुमारजी बडोले, माजी पालकमंत्री परिणयजी फुके, खासदार सुनीलजी मेंढे आमदार विजयभाऊ रहांगडाले, माजी आमदार केशवरावजी मानकर, संजयजी पुराम, हेमंतभाऊ पटले, खोमेशभाऊ रहांगडाले, भेरसिंहभाऊ नागपुरे, बाळाभाऊ अंजनकर, संजीव कुलकर्णी उपस्थित होते.
अशी आहे कार्यवृत्त पुस्तिका
कार्यवृत्त पुस्तिकेत पंकज रहांगडाले यांनी आपल्या मनोगतात जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संधी दिल्याबद्दल पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. सोबतच त्यांनी आपला एका वर्षाचा कार्यकाळ सामान्य नागरिकांना समर्पित केला आहे. आपल्या पुस्तिकेत त्यांनी पाणीपुरवठा, महिला व बालविकास, आरोग्य, शिक्षक, स्वच्छता, पर्यटन, व्यापार, शेतकरी, क्रीडा आणि संस्कृती अशा विविध राबवलेल्या योजना आणि संकल्पना नागरिकांपुढे मांडल्या आहेत.





