31.4 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Top News अजित पवार व समर्थकांची दीड तास पवारांशी चर्चा, पण तोडगा नाही

अजित पवार व समर्थकांची दीड तास पवारांशी चर्चा, पण तोडगा नाही

0
40

blank

मुंबई –राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदारांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाध्यक्ष शरद पवार यांची येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी मंत्र्यांनी रविवारीच पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या गोटातील आमदारांनी पवारांची भेट घेतली.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, विधिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर अजित पवार व त्यांचे आमदार यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहोचले. तेव्हा शरद पवार सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानी होते. तेथून ते थेट वाय बी सेंटरमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी अजित पवार व त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला. जवळपास तासभर हा संवाद सुरू होता. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांना बजावलेले व्हीप तथा विरोधी पक्षांच्या बंगळुरूतील बैठकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी होत असल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

blank

बंडखोर आमदार भेटीला येणार हे माहिती नव्हते

शरद पवार यांच्या गटाची आज वाय बी सेंटरवर बैठक होती. या बैठकीसाठी त्यांचे आमदार जमले होते. पण या बैठकीपूर्वीच अजित पवार व त्यांचे समर्थक आमदार वाय बी सेंटरवर पोहोचले. या घटनाक्रमाची शरद पवारांना कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी वाय बी सेंटरवर पोहोचताच जितेंद्र आव्हाडांकडे या ठिकाणी पत्रकार का पोहोचले? याची माहिती घेतली. या घडामोडीमुळे जयंत पाटील यांनी आपल्या आमदारांना प्रदेश कार्यालयात जाण्याचे निर्देश दिले.

blank

पवार, अजित पवार, पटेलांत बैठक

वाय बी सेंटरवर शरद पवार यांची अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली. त्यात बंडखोर गटाने शरद पवारांची सोबत येण्यासाठी समजूत काढली. या ठिकाणी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड व रोहित पवारही उपस्थित होते. पण त्यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले.

रविवारीच घेतली होती भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी आपल्या समर्थक 9 मंत्र्यांसह शरद पवार यांची बाय बी चव्हाण सेंटरला जावून भेट घेतली. त्यात या नेत्यांनी त्यांच्याकडे भाजपसोबत येण्याचा आग्रह धरला. पण पवारांनी त्यांच्या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परिणामी, अजित पवार गटाच्या नेत्यांनी ही बैठक आटोपती घेतली. या भेटीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असताना सोमवारी पुन्हा अजित पवार आपल्या आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते.

blank

राष्ट्रवादीत पुन्हा समेट होणार का?

सर्व बंडखोर आमदार व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला आल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे आमदार शरद पवार यांना गुंता सोडवण्याची विनंती करणार आहेत. त्यामुळे शरद पवार बॅकफूटवर जाणार का? राष्ट्रवादीत पुन्हा समेट होणार का? झाला तर तो कशा पद्धतीने असेल? शरद पवार भाजपसोबत जाणार का? की शरद पवार पक्षावरील दावाही सोडणार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेत. विद्यमान घडामोडी पाहता या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

त्यांच्या मनात काय, मी कसे सांगू

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्ही माहिती काढली की, आज शरद पवार साहेब चव्हाण सेंटरला दुपारी येणार आहेत. म्हणून आम्ही इथे आलो. सर्व आमदारांनी शरद पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला. काल मी म्हणालो तशीच पक्ष एकसंघ राहण्यासंदर्भात आम्ही शरद पवारांना विनंती केली. शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं. आता त्यांच्या मनात काय आहे हे आम्ही कसं सांगू शकणार?” असंही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.