29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ कोतवाल भरती पुनर्रपरीक्षा १३ ऑगस्ट रोजी

कोतवाल भरती पुनर्रपरीक्षा १३ ऑगस्ट रोजी

0
29

= परीक्षेच्या दिवशी निकाल : १५ ऑगस्ट पर्यंत नियुक्तीपत्र देणार=
( 2017 ची पुनरावृत्ती तर होणार नाही ना ? )
अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे )–कोतवाल भरती परीक्षा रद्द झाल्यानंतर पुनर्रपरीक्षा रविवारी(१३) घेतली जाणार आहे.सरस्वती विद्यालयातील सीसीटीव्हीच्या निगराणीत ही परीक्षा घेतली जाणार आहे.अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे यांनी दिली आहे.
यापूर्वी ३० जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली होती. यात बऱ्याच अनियमितता होत्या.कॉपी प्रकरणही गाजले होते.शेवटी ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.मात्र ही परीक्षा रद्द झाल्याचे कुठलेही पत्र अद्याप निघाले नाही हे विशेष.ही परीक्षा नेमकी रद्द का झाली ? ज्या कारणांमुळे रद्द झाली त्याची चौकशी झाली का ? हे प्रश्न अद्यापही कायम आहेत.
हे असतांना नव्याने १३ ऑगस्ट रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत विद्यालयाचे शिक्षक परीक्षा खोलीवर राहणार आहेत.यावर महसूल विभागाचे कर्मचारी देखरेख ठेवतील.जिल्हाधिकारी कार्यालयातील निरीक्षक असणार आहेत.परीक्षेची वेळ ११:३० राहणार असून परीक्षार्थींना ११ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे.यादृष्टीने चोख बंदोबस्तासाठी अधिकचे पोलीस कर्मचारी परीक्षा केंद्रावर तैनात केले जाणार आहेत.

तहसीलदार व मी येथे नव्याने बदलून आलो.परीक्षा केंद्राच्या सुसज्जतेची दोघांनाही माहिती नव्हती.परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे घेतली जाईल.परीक्षेचा निकाल परीक्षा संपल्यानंतर त्याच दिवशी घोषित केला जाईल.पात्र उमेदवारांना १५ ऑगस्ट पर्यंत नियुक्तीपत्र दिले जाणार आहेत.परीक्षेचे सीसीटीव्ही चित्रीकरणाची कुणी मागणी केल्यास त्याला देण्याची व्यवस्था केली आहे.आगामी काळात पोलीस पाटील परीक्षेचे आयोजन सुध्दा सरस्वती विद्यालयातच केले जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे यांनी दिली.
*=चौकट =*
*2017 ची पुनरावृत्ती तर होणार नाही ना*
अर्जुनी मोर. तालुक्यात कोतवाल भरतीला 2017 पासूनच ग्रहण लागले आहे. सन 2017 ला 13 कोतवाल पदासाठी 20 ऑगस्ट 2017 ला परिक्षा घेण्यात येणार होती.परीक्षेची पुर्ण तयारी सुध्दा झाली होती. परिक्षा सुरु होणार एवढ्यात तांत्रिक कारणांमुळे ही परीक्षाच रद्द करण्यात येत असल्याची नोटीस लावण्यात आली होती.नंतर ही परिक्षा 10 सप्टेंबर 2017 घेण्याचे निश्चित झाले होते.मात्र ऐनवेळी तालुक्यात 40 ग्रामपंचायत च्या निवडणुका जाहीर होवुन आचारसंहिता लागु झाल्याने ही परिक्षाच रद्द करण्यात आली. आता तब्बल सहा वर्षानंतर कोतवाल पदासाठी मुहूर्त निघाला.तालुक्यात 21 कोतवाल पदे रिक्त आहेत. मात्र शासनाचे 80 टक्के पदभरतीला मान्यता असल्याने 17 कोतवाल पदासाठी परीक्षेचा मुहूर्त निघाला. त्यातही चार जागेसाठी अर्ज प्राप्त न झाल्याने 13 जागांसाठी 22 जुलै 2023 ला परिक्षा घेण्याचे ठरले.मात्र प्रशासकिय बाब पुढे करुन पुन्हा ही परिक्षा 30 जुलै 2023 ला अर्जुनी मोर. व सडक/ अर्जुनी या उपविभागासाठी घेण्यात आली. 30 जुलै 2023 च्या कोतवाल परिक्षेत प्रचंड घोळ झाल्याने याही परीक्षेला गालबोट लागले. अनेक परीक्षार्थींनी कोतवाल भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याची तक्रार करून आंदोलन व उपोषण केले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांचे आदेशानव्हे उपविभागीय अधिकारी वरूण शहारे यांनी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे लेखी पत्र दिले होते. आता ही परीक्षा प्रचंड बंदोबस्तात 13 ऑगस्ट रोजी सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव येथे सीसीटीव्ही कॅमेरे च्या देखरेखी खाली पोलीस बंदोबस्तात घेण्यात येणार आहे.

blank