
गोंदिया, दि.2 : आदिवासी समाजासाठी व त्यांच्या उध्दारासाठी शासनाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील प्रश्न मनात न ठेवता विचारणा करुन सोडवावेत व आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रामाणिकपणे अथक प्रयत्न करुन आपले उद्दिष्ट साध्य करावे व उद्दिष्ट प्राप्तीनंतर आपल्याच रहिवासी क्षेत्रामध्ये काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी अंतर्गत येत असलेल्या शासकीय/अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य रेसीडेन्शीयल स्कुल बोरगाव/बाजार येथे शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये मिशन शिखर उपक्रम अंतर्गत २०० विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET च्या शिकवणी वर्गाचे १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनीय कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, प्रभारी उपविभागीय अधिकारी देवरी संतोष महाले, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी अंतर्गत येत असलेल्या ७ उच्च माध्यमिक आश्रमशाळा, ६ अनुदानित आश्रमशाळा व १ एकलव्य आश्रमशाळा येथे शिक्षण घेत असलेले वर्ग १२ वी विज्ञानचे एकुण २०० विद्यार्थी सदर शिकवणी वर्गामध्ये सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे १ सप्टेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत (नोव्हेंबर महिना वगळून) असे एकुण ४ महिने शिकवणी वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET परीक्षेबाबत संपुर्ण मार्गदर्शन करण्यात येणार असुन या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयामार्फत शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सांगितले. तसेच या चार महिन्याच्या कालावधीमध्ये शिकवणी वर्ग सुरु असतांना कोणत्याही पालकांनी आपल्या पाल्ल्यांना कोणत्याही सणवार अथवा समारंभाला घेऊन जाऊ नये, जेणेकरुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकरीता पालकांना त्यांनी विनंती केली.
प्रकल्प कार्यालयाअंतर्गत सुरु असलेल्या मिशन टॅलेन्ट सर्च उपक्रमाचे २५ऑगस्ट २०२३ रोजी शासकीय कन्या आश्रमशाळा बोरगाव/बाजार येथे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा येथील प्राविन्य प्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह गोंदिया क्र.१ व २, मुलांचे वसतीगृह देवरी क्र.१ तसेच मुलींचे वसतीगृह क्र.२ येथील शिक्षण घेत असलेल्या एकुण १३ विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले. या विद्यार्थ्यांसह गृहपाल यांचे व माहे ऑगस्ट महिन्यामध्ये शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास प्राचार्य संजय बोंतावार, संजय बोरकर, श्री. कळंबे, श्री.कापसे श्री.भोयर आदी मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प कार्यालय स्तरावरुन श्री. सोनेवाने, श्री. मेश्राम, श्री. भुसारी या सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी तसेच विस्तार अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. वाघमारे व श्री. मांडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. मोरे यांनी मानले.