आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी 48 खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा-उद्धव ठाकरे

0
11

मुंबई:-राज्यातला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी राजीनामा द्यावा. त्याचाही परिणाम पंतप्रधानांवर होणार नसेल तर महाराष्ट्रातल्या 48 खासदारांनी एकजुटीने राजीनामा देऊन महाराष्ट्राची ताकद दाखवा, असं आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

मातोश्री येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी चिंतामणराव देशमुखांनी दाखवलेल्या स्वाभिमानी बाण्याची आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी जागवली. ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी मुंबईत मोरारजी सरकारच्या आदेशाने जो गोळीबार झाला, त्याची चौकशी करण्यासाठी नकार दिला होता. तेव्हा थेट नेहरूंसमोर उभे राहून चिंतामणराव देशमुखांनी म्हटलं की, तुम्ही या गोळीबाराची चौकशी करत नाही. याचा अर्थ तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस आहे, मला तुमच्या मंत्रिमंडळात राहायचं नाही, हा घ्या राजीनामा. तसं या मंत्र्यांनी महाराष्ट्रातील अस्वस्थतेबद्दल पंतप्रधानांना सांगायला हवं की महाराष्ट्र पेटतोय, जातीपातींमध्ये भिंती उभ्या राहताहेत. सर्व समावेशक असं आरक्षण तुम्ही देणार आहात की नाही, जर देणार नसाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही. हा घ्या आमचा राजीनामा, असं केलं तरच हा प्रश्न पुढे सोडवला जाईल, आणि मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतरसुद्धा जर पंतप्रधानांवर काही परिणाम होणार नसेल तर मग मी असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या 48 खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा. महाराष्ट्राची ताकद काय असते, महाराष्ट्र कसा एकवटतो ते दाखवायची वेळ आता आलेली आहे. हुकूमशाही तोडून मोडून टाकण्याची वेळ आता आलेली आहे. मराठा समाज, ओबीसी, धनगर समाज यांना समाधानी करणारं आरक्षण हे पंतप्रधांनी दिलं पाहिजे. लोकसभेत दिलं गेलं पाहिजे. त्यात केंद्र सरकार हात वर करत असेल तर महाराष्ट्रातल्या या मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा काही अधिकार नाही. म्हणून मी सर्व मंत्र्यांना सांगतोय की तुम्ही ज्यावेळी केंद्रीय कॅबिनेट मीटिंग असेल तेव्हा पंतप्रधानांसमोर सांगा की बाकीचे विषय बाजूला ठेवा, हा आमचा पहिला मुद्दा आहे. यावर काय ते सांगा. नाहीतर आमचा राजीनामा आहे. एवढी धाडस त्यांनी दाखवावं अशी आमची अपेक्षा आहे.’ असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी खासदारांना केलं आहे.