सोनेगाव येथील शेतात पट्टेदार वाघाचे दर्शन….

0
53

भंडारा: धानपीक कापणीसाठी गेलेल्या महिला मजुरांना शेतात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ दिसताच महिला मजुरांची भंबेरी उडाली आणि त्यांनी गावच्या दिशेने पळ काढला. तुमसर तालुक्यातील सोनेगाव येथे आज  १७ मे रोजी सकाळी ८ वाजता वाघाचा शेत शिवारातील पळतानाची चित्रफीत प्रसारित झाली.

सध्या सिहोरा परिसरात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उन्हाळी धान पिकाची कापणी सुरू असून सोनेगाव येथील शेतकरी मनलाल चव्हाण यांच्या शेतात काही महिला मजूर धान कापणीसाठी गेले असता त्यांना शेतात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. यावेळी महिलांनी जीव मुठीत घेऊन शेतातून पळ काढला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी वाघ बघण्यासाठी शेतात मोठी गर्दी केली. वाघाला पाहताच लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. लोकांच्या आवाजाने वाघ सैरावैरा पळू लागला. सुदैवाने शेतात कुणी नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तुमसर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जे. रहांगडाले, वनरक्षक डी. ए. काहुडकर, आर.ओ. डेहनकर, वनरक्षक एच. एम. आहाके, आर.डी.चौधरी, ए. जे. वासनिक, ए. एस. सेलोकर तसेच सिहोरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.