किटकजन्य आजार निर्मूलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा

0
133

-डॉ.विनोद चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी
गोंदिया,दि.२४-राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमअंतर्गत समावेश असलेल्या रोगांपैकी डासांमार्फत प्रसारीत होणार्या हिवताप,हत्तीरोग,डेंग्यु,जॅपनिज एन्सेफलाईटस,चिकुनगुनिया असे विविध आजार निर्मूलनासाठी उपचाराबरोबरच प्रतिबंध हा महत्वाचा असतो.असे आजार निर्मूलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ राखणे महत्वाचे असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी म्हटले आहे.
पावसाळ्यात किटकजन्य आजार प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा हिवताप विभागामार्फत 106 गावात कीटकनाशक फवारणीची प्रथम फेरी दि.20 जून पासून सुरू केली असून लोकांनी आपल्या घरातील भागात,भिंतीवर कीटकनाशक फवारणी करून आलेल्या फवारणी पथकास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी केले आहे.आपल्या गावात कीटकनाशक फवारणी पथक आल्यास आपले घर फवारून घ्यावीत.फवारणी झालेली घरे तीन महिन्यापर्यंत सारवु व रंगरंगोटी करु नयेत एवढी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कीटकनाशक फवारणी संवेदनशील भागात डास नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी पावसाळ्यात दोनदा केली जाते याचा प्रभाव अडीच ते तीन महिने राहतो तरी गावातील लोकांनी 100% घर फवारणी करून घ्यावीत.
किटकजन्य आजारामध्ये हिवताप पूर्णतः मानव निर्मित आजार आहे असे तज्ञांचे मत आहे.कारण हिवतापाचा प्रसार करणाऱ्या डासांचा समूळ नायनाट करणे व डासोत्पत्ती स्थाने नष्ट करुन हिवतापाला आळा घालणे हे मानवाच्याच हातात आहे. हिवतापाला आळा घालण्यासाठी प्रथमतः दोन गोष्टी अंमलात आणावयास हव्यात.एक म्हणजे डासांवर नियंत्रण व हिवतापाने बाधीत झालेल्या रुग्णास समूळ उपचार देऊन रोग जंतूंचा समूळ नायनाट करणे.
किटकनाशक फवारणी : हिवताप पारेषण काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हिवतापासाठी अतिसंवेदनशील निवडक व उद्रेकग्रस्त गावांमध्ये सिंथेटिक पायरेथ्रॉईड गटातील किटकनाशकाची घरोघर फवारणी करण्याचे नियोजन हिवताप विभागाकडुन करण्यात आले असुन जिल्ह्यातील 106 गावात प्रथम फेरीदरम्यान किटकनाशक फवारणी करण्यात येणार आहे.जिल्ह्यात विविध भागात 7 फवारणी टिम तयार करण्यात आले असुन प्रत्येक टिम मध्ये 6 फवारणी कर्मचारी कार्यरत राहणार आहे.फवारणी कार्यक्रमात जिल्हा स्तरावरुन 5 आरोग्य पर्यवेक्षक यांचे सोबत प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा सेविका यांचे मार्फत गुणवत्तापुर्ण फवारणी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
किटकनाशक फवारणीसाठी गावाचे निकष- मागील वर्षामध्ये

  1. कार्यक्षेत्र गावात 1000 लोकसंख्ये मागे 2 किवां 2 पेक्षा जास्त हिवताप दुषित वार्षिक परजीवी निर्देंशांक (ए.पी.आय.)असलेली गावे.
  2. प्लास्मोडियम फँल्सीपेरम हा मलेरियाचा सर्वात गंभीर प्रकार आहे.ज्यामुळे सेरेब्रल मलेरिया आणि मृत्यू होऊ शकतो तरी वार्षीक प्लास्मोडियम फँल्सीपेरम (पी.एफ.)ची टक्केवारी 30 पेक्षा जास्त असलेली गावे.
  3. हिवतापाने मृत्यु झालेले गावे.

लक्षात ठेवामलेरिया घातक ठरु शकतो : कुठल्याही तापाकडे दुर्लक्ष करु नका.हा ताप मलेरिया असू शकतो.हा ताप मलेरिया तर नाही याबद्दल खात्री करुन घ्यावी.औषध विक्रेत्याच्या अथवा स्वतःच्या अल्पज्ञानावर तापाकरीता परस्पर औषधे घेवू नका.यासाठी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात मलेरियासाठी सोपी व सुलभ रक्त तपासणी करुन घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण औषधोपचाराचा उपचार घ्यावा. योग्यवेळी समूळ औषधोपचार केल्याने मलेरियाचा रुग्ण खात्रीने व हमखास बरा होतो. हिवतापाच्या निश्चित निदानासाठी तापाच्या रुग्णाचा रक्तनमुना घेवून तो सुक्ष्मदर्शकाखाली तपासणे आवश्यक असते.
डास नियंत्रणासाठी हे करा : मलेरिया पसविणारे डास आपण साठविलेल्या स्वच्छ पाण्यात आढळतात. पाण्याच्या टाक्यात डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून त्या दुरुस्त करणे, त्यास झाकण बसविणे व गळती थांबविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.दैनंदिन वापराच्या पाण्याकरीता घरामधील तसेच घराबाहेरील पिंप आठवडयातून दोनदा पूर्णपणे रिकामी व स्वच्छ करून पुन्हा भरणे व ती झाकून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.डासांचा उपद्रव पूर्णपणे टाळण्यासाठी पाण्याच्या सर्व टाक्या तसेच पिंप इत्यादी सर्व साठे डासप्रतिबंध स्थितीत आणि व्यवस्थित झाकून ठेवावे.इमारतीच्या गच्चीवर आणि परिसरात अनावश्यक पाणी साचू देवू नका.परिसरातील घराजवळील पाण्याची डबकी वेळीच बुजवा किंवा वाहती करा.
डासांपासून संरक्षण : वैयक्तीक सुरक्षिततेसाठी झोपतांना विशेषतः किटकनाशक भारित मच्छरदाणीचा वापर करावा.डास प्रतिबंधक यंत्रे, मलम, अगरबत्ती वापरावी.घराच्या खिडक्यांना बारीक जाळीचे पडदे लावावेत.तसेच हिवतापाची लागण झाल्यास घाबरुन जाऊ नये, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ताची तपासणी करावी व औषधोपचार घ्यावा.
त्यामुळे हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबरच प्रतिबंध महत्वाचा आहे.हिवताप निर्मूलनासाठी प्रत्येक नागरीकाचा वैयक्तिक सहभागही त्यामध्ये असणे आवश्यक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे.