बरडटोली शाळेची पूर परिस्थिती कायम
विद्यार्थी घेत आहेत समाज मंदिरात बसून शिक्षणाचे धडे
अर्जुनी मोर.दि.२२ः मागील तीन दिवसापासून अर्जुनी मोरगाव तालुक्यात मुसळधार पावसाच्या धारा कोसळत आहेत. अनेक रस्ते जलमय झालेले आहे. बरडटोली जिल्हा परिषद शाळा सुद्धा यापासून सुटलेली नाही. मागील तीन दिवसापासून शालेय परिसरात कमरेवर पाणी साचलेले आहे.अनेक साहित्याची नाशधुस झालेली आहे.वर्गात जाणे सुद्धा कठीण झालेले आहे.अशा कठीण परिस्थितीत सुद्धा शालेय विद्यार्थी समाज मंदिरामध्ये बसून शिक्षणाचे धडे घेत आहेत.विशेष म्हणजे बरडटोली शाळेत ही समस्या दरवर्षी निर्माण होत असल्याची जाणिव याच तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत असलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती इंजि.यशवंत गणविर यांना ठाऊक असतानाही त्यांनी आपल्या कार्यकाळात या शाळेची समस्या सोडविण्याकडे सपेशल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून सर्व विद्यार्थ्यांना समाज मंदिरामध्ये बसवून शिक्षणाचे धडे देणे सुरू केले आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची इथंभुत कल्पना दिलेली आहे.त्यातच चांगल्या प्रशासनाच्या बाता मारणारे मुख्य कार्यकारी अधिकारी हे फक्त प्रसिध्दीत आपण कसे आलो पाहिजे याकरीताच काम करीत असल्याचे दिसून येत असल्यानेही अनेक समस्याकंडे त्यांचे लक्ष गेलेले नाही.
बरडटोली जिल्हा परिषद शाळेत एक ते चार वर्ग असून एकूण सदतीस विद्यार्थी अध्ययन करीत आहेत.जोपर्यंत नवीन इमारत मंजूर होऊन बांधकाम होत नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच कायम राहील. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.





