पोलिसभरतीत निवड झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
वाशिम,दि.१५ ऑगस्ट-आदिवासी मुलींनो शिक्षणाचे महत्त्व समजून घ्या. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.ध्येय ठरवा.आजच्या विद्यार्थी दशेत परिश्रम घ्याल .तर उद्याचे भविष्य उज्ज्वल होईल. स्पर्धा परीक्षेत जे उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर यशस्वी उमेदवारांची मार्गदर्शनपर व्याख्याने ऐकावीत. त्यांची विविध मासिके, वर्तमानपत्रे, अनियतकालिके यामधून प्रकाशित झालेल्या मुलाखती वाचाव्यात.असे प्रतिपादन रमेश मोरे यांनी केले.
आदिवासी मुलींचे शासकिय वसतीगृह क्र.१ येथे पोलिस खात्यात नवनियुक्त झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून श्री.मोरे बोलत होते . पुढे ते म्हणाले,आदिवासी समाज हा प्रवाहात यावा आणि शिक्षण घेणाऱ्या ईतर विद्यार्थीनींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना योग्य दिशा देण्याचे काम योग्य वेळी झाले तर त्याचा फायदा निश्चित समाजाला होतो.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राज्य आदिवासी बिरसावादी संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव डाखोरे , ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन वाशिम जिल्हाध्यक्ष नाजुकराव भोंडणे, शिक्षक केशव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.आदिवासी संस्कृतीचे पेहराव, सादर केलेले लक्षवेधी नृत्य…रंगलेला सांस्कृतिक सोहळा… याचे विलोभनीय दृश्य आज गुरुवारी (ता. १५) आदीवासी मुलींच्या वसतिगृहात अनुभवायला मिळाले. ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगीविविध स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत विजयी विद्यार्थीनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. गायत्री लोखंडे, प्रिया टाले या आदिवासी वसतीगृहात शिकणाऱ्या दोन विद्यार्थीनींची नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीमध्ये निवड झाली. या अनुषंगाने या विद्यार्थीनींचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रिया टाले या विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त केले.ती म्हणाली माझ्या आई बाबांनी मला नेहमीच सहकार्य केले.अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा मोलाचा सल्ला तिने उपस्थित विद्यार्थीनींना दिला.गायत्री लोखंडे हिने सुध्दा मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली महाविद्यालयाच्या शिक्षणाच्या अभ्यासासोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा.क्रीडा क्षेत्रात करिअर करा. कारण आदिवासी समाज प्रवाहात आला पाहिजे. आपले आईवडील अहोरात्र मेहनत करतात .त्या कष्टाचे चीज झाले पाहिजे.
डाखोरे म्हणाले, स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेकांना चार ते पाच वेळा प्रयत्न करावे लागतात. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. बरेच विद्यार्थी बारावीनंतर चार-पाच वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करून स्पर्धा परीक्षांकडे वळतात. त्यामुळे त्यांची तयारी उशिरा सुरू होते व पुढे परत चार-पाच वर्षे अभ्यासात गेल्याने ते लवकर यश संपादन करू शकत नाहीत.
केशव शिंदे म्हणाले, प्रत्येक गोष्टीचे नियोजन करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात आपले अस्तित्व टिकले पाहिजे. त्यासाठी अभ्यास केला पाहिजे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.अचूक नियोजन,वेळेचा सदुपयोग करून स्वत:चे भविष्य घडवा.
श्री.बुडके यांनी एम.पी.ए.सी , यु पी.ए.सी व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वजन सहभागी होतात. पण ह्या परीक्षेचा आवाका न समजून घेता परीक्षा देतात . त्यामुळे त्यांना अपयशाचा सामना करावा लागतो . स्पर्धा परीक्षांचा आवाका समजून घेवून त्या दिल्या तर यशस्वी होण्याची प्रमाण वाढते . आणि आपणास आपल्या इच्छित पोष्टला गवसणी घालता येते . आपण ज्या शाखेत , वर्गात , विभागात शिकतो त्यामध्ये पूर्णपणे सहभागी होऊन स्वतःला झोकून दिले पाहिजे .असे मनोगत व्यक्त केले.
श्री.भोंडणे म्हणाले, आपले जीवन जगत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारला पाहिजे.स्वत:ची सर्वांगीण प्रगती साधायची असेल तर अंधश्रद्धेला बळी पडू नये. इंटरनेटच्या माध्यमातून आपणास हवी ती माहिती व मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकते. स्पर्धा परिक्षेच्या संदर्भात अनेक संकेतस्थळे व यू ट्यूबद्वारे खूप माहिती उपलब्ध आहे. लेखन, मनन, वाचन, चिंतन आणि मेहनत या पंचसूत्रीतून प्रभावी व्यक्तिमत्त्व सुधारता येते. राष्ट्रसंताचे विचार अंगीकृत करा. खेळांना प्राधान्य द्या .असेही ते यावेळी म्हणाले.
वस्तीगृहाच्या अधिक्षिका अनुराधा बिसणे, अपर्णा देशमुख तसेच काही विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रम प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.कार्यक्रमाचे संचालन स्वाती धोंगडे तर आभार शारदा डाखोरे या विद्यार्थीनींनी मानले. कार्यक्रमासाठी वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले.