विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे- केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू

0
38

मुंबई, दि. १४ ऑक्टोबरः भारताकडे अतुलनीय युवा शक्ती असून ही या राष्ट्राची बलस्थाने आहेत. त्यामुळे विकसीत भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे असणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी केले. ते आज मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या ‘व्यक्तिमत्व विकास व विविध शैक्षणिक संधी’ यावर उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, प्रा. बाळासाहेब आपटे विद्यार्थी व युवा चळवळी अभ्यास केंद्र, विशेष कक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि डॉ. आंबेडकर मेडिकोस असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या डॉ. संगीता अंभोरे यांच्यासह पंडीत माळी, प्रा. मनिषा कर्णे, प्रा. बळीराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना किरेन रिजिजू म्हणाले, भारताला क्रीडा संस्कृतीचा मोठा वारसा लाभला असून या क्रीडा संस्कृतीचा विकास करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून खेलो इंडिया आणि फिट इंडिया सारखे महत्वाचे उपक्रम राबविले जात असून अनेक युवा खेळाडूंना या माध्यमातून क्रिडा क्षेत्रात संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. विद्यार्थी दशेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी एका मोठ्या ध्येयप्राप्तीचे उद्दिष्ट बाळगून ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. राज्य आणि केंद्र शासनामार्फत विद्यार्थ्यांसाठी अनेक संधीचे दालने खुली करण्यात आली असून या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी भारत स्पोर्ट्स पॉवरहॉउस म्हणून वाटचाल करत असताना विद्यापीठातील अनेक विद्यार्थी हे अथक प्रयत्न करून राज्य आणि देशपातळीवर नावलौकीक कमावताना दिसत असल्याचे सांगितले. तसेच मुंबई विद्यापीठामार्फत पारंपारिक अभ्यासक्रमांसह कौशल्याधारीत अभ्यासक्रमांत करिअरच्या विविध संधीचे दालन खुले करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे संचालक सुनील वारे यांनी बार्टीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली.