30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी आमदार रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती

भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी आमदार रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती

0
117

blank

मुंबई::-आजपासून शिर्डीत भाजपाचं अधिवेशन सुरू होत आहेत.तर भारतीय जनता पक्षाच्या शिर्डीतील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवारी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठी घोषणा केली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे रविंद्र चव्हाण यांची तुर्तास कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.त्यामुळे भाजप अध्यक्षपदाची नेमणूक अजून काही दिवस लांबणीवर पडलेली आहे.मार्चमध्ये भाजपाध्यक्षपदाची निवड होणार असल्याचे सांगण्यात येते.

भारतीय जनता पार्टीचे आमदार रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी याबाबत पत्र काढून चव्हाण यांची निवड केली आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याजागी आता रविंद्र चव्हाण प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

आता रविंद्र चव्हाण भाजप पक्षाचा कारभार हाकणार आहेत. महायुतीच्या नव्या मंत्रीमंडळात चव्हाणांना स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी नाराजी न व्यक्त पक्ष जो आदेश देणार त्याचे पालन करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांना पक्षसंघटनेत मोठे पद मिळणार असल्याच्या चर्चा होत्या. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सलग चौथ्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.रविंद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते म्हणून ओळख आहे.रविंद्र चव्हाण हे मूळ कोकणातील आहेत, परंतु डोंबिवली मतदारसंघातून ते निवडून येतात.रविंद्र चव्हाण यांनी मंत्रिमंडळातही काम केले आहे, प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे.महायुतीच्या मागील मंत्रिमंडळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिले. परंतु यंदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही.

दरम्यान, भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आता मंत्रीपदाची धुरा असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानंतर आता पक्षसंघटनेची सूत्र आता रविंद्र चव्हाणांच्या हाती असणार आहेत. दरम्यान, बावनकुळे आणि चव्हाण हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे आहेत. रवींद्र चव्हाण हे मराठा समाजाचे, तर बावनकुळे ओबीसी समाजाचे आहेत. बावनकुळे यांना मंत्रिमंडळात चौथे महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आता चव्हाण यांच्या रूपाने मराठा कार्यकारी अध्यक्ष बनवून भाजपाने समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.आजपासून शिर्डीत भाजपाचं अधिवेशन होणार असून तत्पूर्वी केंद्रीय भाजपाने रवींद्र चव्हाण यांना नवी जबाबदारी दिली आहे.

blank