
गोंदिया,दि.26: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात ते सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी सदैव दक्ष होते. समाजातील दुर्लक्षित मागासवर्गीय दुर्बल घटकांच्याप्रती त्यांचा दृष्टीकोण विशेष सहानुभूती व सुधारणावादी होता. मागासवर्गीय, अपंग, वृद्ध, निराधार, दुर्बल इत्यादी घटकांच्या कल्याणार्थ त्यांनी अनेक निर्णय अमलात आणले. त्यांचा आदर्श समाजापुढे विशेषत्वाने यावा, या दृष्टिकोनातून त्यांचा जन्मदिवस दिनांक 26 जून 2025 हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी राज्य गीत व संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले तसेच व्यसनमुक्तीबाबत शपथ घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया किशोर भोयर यांनी केले. प्रास्ताविका दरम्यान राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या, राज्यात मोफत प्राथमिक शिक्षण सुरु केले तसेच वैदिक शाळांची स्थापना केली, धर्मग्रंथ शिकण्यासाठी सर्व जातीतील विद्यार्थ्यांना प्रेरीत केले, बालविवाह प्रथा बंद करण्यात आली याबाबतची विस्तृत माहिती दिली.
समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग, अपंग, वृध्द, निराधार, दुर्बल घटकांसाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत दिनांक 26 जून ते 25 ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहिम राबविण्याबाबत तसेच एक जिल्हास्तरीय विशेष कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हास्तरीय सामाजिक न्याय शक्तीप्रदत्त समितीमार्फत सुनिश्चित करुन आयोजित करण्यात येईल याबाबत उपस्थित प्रेक्षकांना माहिती दिली.
“सामाजिक न्याय दिन” प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार, विधानसभा क्षेत्र अर्जुनी/मोर राजकुमार बडोले यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगिकृत करावे असे आवाहन प्रेक्षकांना केले.
सामाजिक न्याय प्रस्थापनेच्या दृष्टीकोणातून कार्यान्वित असलेल्या योजनांतर्गत लाभार्थ्यांना पारितोषिक वितरण व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गोंदिया जिल्ह्यात कार्यरत शासकीय वसतीगृहे, शासकीय निवासी शाळा येथील इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे सत्कार, अनु.जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, नंगपुरा (मुर्री) येथील शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवून सत्कार करण्यात आले. तसेच भाष्कर गायकवाड, रा.तिरोडा ता. तिरोडा जि. गोंदिया यांना सन 2023–24 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार दिनांक 10 जून 2025 रोजी झालेल्या विविध पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पुरस्कार प्राप्तीबाबत सत्कार करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य याबाबत मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने दिनांक 26 जून 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथील सांस्कृतिक सभागृहात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती निमित्य “सामाजिक न्याय दिन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार, विधानसभा क्षेत्र अर्जुनी/मोर. राजकुमार बडोले, प्रमुख अतिथी अतिरिक्त जिल्हाधिकारी मिनाज जन्नत गनी मुल्ला, प्रमुख अतिथी/वक्ते म्हणुन सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग अनिल देशमुख, से.नि. उपनिबंधक लखनसिंग कटरे, सहकार प्रमुख वक्ते जमाईवार, ज्येष्ठ नागरिक बुध्दे, माजी समाज कल्याण सभापती विश्वजित डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी बेहरे प्रामुख्याने उपस्थित होते.
“सामाजिक न्याय दिन” प्रसंगी दलितमित्र पुरस्कार प्राप्त भदन्त संघसाधु धम्मकुटी, ह.भ.प. मुन्ना ठाकुर, जगन्नाथ राऊत, लिलाताई, आशा जैन उपस्थित होते. रोपटे देवून सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया किशोर भोयर यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित वक्त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाकरीता सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय/अधिनस्त महामंडळे, शासकीय वसतीगृहे व निवासी शाळेतील अधिकारी/कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया किशोर भोयर, संचालन क.लि.आशिषकुमार जांभुळकर तसेच आभार प्रदर्शन हेमंत घाटघुमर यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता समाज कल्याण निरीक्षक राजेश मुधोळकर, ल.टं. लेखक पी.ए. गणविर, मनिषा टेंभुर्णे, निशांत वाघमारे, गिरीधर गोबाडे, निवेदिता बघेले, पुष्पलता धांडे, योगेश हजारे, मानिकराव ईरले, पंकज काळे, लक्ष्मण खेडकर, शैलेश उजवने तसेच एस-2. बीव्हीजी, क्रिस्टल लि. बाह्यस्रोत कंपनीचे कार्यरत कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.