
जिल्हास्तरीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी घेतला आढावा
गोंदिया,दि.१८ – जिल्हास्तरीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची आढावा सभा जिल्हा परिषदेतील स्व.वंसतराव नाईक सभागृहात संपन्न झाली.आढावा सभेप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांच्या प्रमुख उपस्थितीत किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम संबधाने होत असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.
आढावा सभेप्रसंगी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे,हिवताप विभागाचे नंदकिशोर भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.हिवताप विभाग विविध कार्यक्रमाचे आढावा सादरीकरण डॉ.विनोद चव्हाण यांनी केले.
आढावा सभेप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी गोंदिया जिल्हा हिवतापाबाबत संवेदनशील जिल्हा म्हणुन घोषित असुन जिल्हा हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे.भात शेतीसाठी पाणीयुक्त चिखलची गरज भासते तसेच तलावांचा जिल्हा म्हणून वेगळी ओळख आहे.तसेच जंगलव्याप्त भाग,घनदाट झाडी व झुडपे यामुळे डास व डास अळीसाठी पोषक वातावरण असते.जिल्ह्यात मजुरांचे स्थलांतरण होत असते.जिल्ह्यात बाराही महिने हिवताप आजाराचे रुग्ण निघत असल्यामुळे हिवतापाचा जर प्रसार रोखायचा असेल तर मच्छरांसोबत डास अळी सुद्धा नष्ट करणे गरजेचे बनलेले आहे.लोकसहभाग व ईतर विभाग,एनजीओ यांचा सहभाग घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांनी गावपातळीवर लोकांना आरोग्य शिक्षण देवुन त्यांच्या सवयी बदलण्याबाबत सामाजिक वर्तणुक बदलण्यावर विशेष लक्ष केंदीत करण्याच्या सुचना केल्यात.
आरोग्य कर्मचारी यांनी हिवताप नियत्रंणासाठी गुणवत्तापुर्वक 3“टी” टेस्टींग,ट्रिटमेंट व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजेच गृहभेटी तुन ताप सदृष रुग्णाची तपासणी,प्रकारानुसार तत्पर उपचार व सभोवतालचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व नियमित फॉलोअप करण्याचा फार्मुला अवलबंविण्याचा दिला मंत्र.लोकसहभागातुन हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे सुचना डॉ.गोल्हार यांनी आढावा सभेत दिल्या.
डॉ.अभिजीत गोल्हार यांनी पावसाळ्यात जलजन्य व किटकजन्य आजार जसे हिवताप, मेंदुज्वर,चिकुनगुनिया, हत्तीपाय व डेंग्युची रुग्ण संख्या कमी करण्यासाठी नियमित गृहभेटी सर्वेक्षण,तालुकास्तरीय हिवताप कार्यशाळेतुन आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा सेविका यांना प्रशिक्षित करणे,डासांची पैदास रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतीचे उपाययोजना,गावात आरोग्य कर्मचार्यामार्फत करण्यात येत असलेले प्रतिबंधात्मक उपाययोजना,हिवतापाबाबतचे प्रभावी पर्यवेक्षण,हिवताप रोखण्यासाठी जैविक बाबींचा वापर,प्रौढ डास कमी करण्याचे विविध पद्धती, हिवताप दुषित रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठीच्या उपाययोजना,मलेरियाच्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी विविध विभागामार्फत करण्यात येणार्या उपाययोजना,डासअळी नाशक पद्धती,आश्रम शाळेतील 100 टक्के विद्यार्थ्यांची रक्त तपासणी,ग्रामपंचायतीच्या सहकार्याने संडास-बाथरुम च्या पाईपला व्हेंट जाळी बसविणे,पत्तासिजन व स्थलातंरित लोकांची आरडीके किट ने मलेरिया बाबत तपासणी करणे,फवारणी कार्यक्रम,कीटकजन्य आजारावर शासनाने ठरवून दिलेल्या निकषांचा अवलंब करून प्रतिबंधात्मक उपाययोजना,किटकजन्य आजाराबाबत जनजागृती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे,शाळा व महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण अशा विविध बाबीवर चर्चा करुन सुचना दिल्यात.
आढावा बैठकीमध्ये किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी, प्रगती आणि अडचणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.सर्व आरोग्य कर्मचार्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती देण्यात आली तसेच कार्यक्रमांमध्ये अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यामध्ये सुधारणा करण्याचे व लाभार्थ्यांपर्यंत सेवा प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देश दिले.ही बैठक आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
आढावा सभेत तालुकास्तरीय किटक शास्त्रज्ञ,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, तालुकास्तरीय पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.या सभेमध्ये कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी व मृत्यू टाळण्यासबांधने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.





