
गोंरेगाव (निंबा),दि.9ऑगस्ट:तालुक्यातील कन्हारटोला येथे आज जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सदस्य रमेश पंधरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत निंबाच्या सरपंच वर्षाताई विजय पटले, सदस्य सौ. संगीताताई कुंजाम, तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय पटले, नंदलाल कुंजाम, रामजी कोडवते, पैकराम उईके, श्यामलाल कुंजाम, गजानन उईके, नेत्राम उईके, माणिक कोडवते यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व सप्तरंगी झेंडावंदनाने झाली. यावेळी सरपंच वर्षाताई पटले यांनी मार्गदर्शन करताना जागतिक आदिवासी दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले.त्या म्हणाल्या की, “9 ऑगस्ट केवळ एक दिवस नसून तो आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा आणि अधिकारांची जाणीव करून देणारा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांनी 1994 मध्ये हा दिवस जाहीर केला असून, त्यामागचा उद्देश म्हणजे आदिवासी समाजाच्या जीवनमानात सुधारणा करणे, त्यांचा सांस्कृतिक वारसा जपणे आणि सामाजिक समानता प्रस्थापित करणे होय.”
त्या पुढे म्हणाल्या की, “आदिवासी समाजाने पिढ्यानपिढ्या निसर्गाचे रक्षण केले आहे. त्यांचे पारंपरिक ज्ञान, कला, संगीत, नृत्य व औषधी वनस्पतींचे ज्ञान हे अमूल्य आहे. आजही हा समाज शिक्षण, आरोग्य, हक्क व सांस्कृतिक जतनाच्या बाबतीत अनेक अडचणींना सामोरे जात आहे. संविधानाने अनुसूचित जमातींसाठी विशेष हक्क दिले असून, पेसा कायदा व वनहक्क कायदा यांसारखे कायदे प्रभावीपणे राबविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी आदिवासी दिवस व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.




