तिरोडा, ता. २९ ः मातीचे घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २९) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास येथील संत सज्जन वाॅर्ड येथे घडली. प्रतिभा मोहन मेश्राम (वय ५२) असे मृताचे नाव असून, त्या संत सज्जन वाॅर्ड रेल्वेस्थानक परिसरात राहत होत्या. विशेष म्हणजे, त्यांचे कोणतेही नातेवाइक किंवा मुले नसल्यामुळे त्या एकट्याच मातीच्या घरात राहात होत्या. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे त्यांचे घर अचानक कोसळले. घर कोसळल्याने त्या मातीखाली दबल्या गेल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा हटवून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





