गोंदिया- निवडणुकीत नवीन कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात येवू नये. नवीन शाखा उघडण्यात येवू नये तसेच त्या लाभांशातून सभासदांचा व्याज कमी करण्यात येईल, असे आश्वासन देवून प्राथमिक शिक्षक संघ प्रणित आघाडी सत्तेत आली. मात्र संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष यांनी मिळून पदभरती आणि शाखा उघडण्याचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. या निर्णयाचा गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने विरोध दर्शविला असून आगामी ३१ ऑगस्ट रोजीच्या आमसभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जि.प. व सासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था भंडारा या संस्थेच्या संचालकांसाठी २० ऑगस्ट २०२३ रोजी पार पडली. ही निवडणूक गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ आणि भंडारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने एकत्रित लढली. या निवडणुकीत शिक्षक संघ प्रणित आघाडीने सत्तेत आल्यास नवीन शाखा उघडण्यात येणार नाही. नवीन कर्मचारी भरती घेण्यात येणार नाही आणि सभासदांचा व्याजदर कमी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे सभासदांनी या आघाडीला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भरघोष मतांनी निवडून दिले. आघाडी कायम राहावी, एकत्रितरीत्या निर्णय घेण्यात यावे, याकरीता कोअर कमिटी तयार करण्यात आली. आश्वासन दिल्यानंतर देखील २७ ऑगस्ट २०१७ रोजी आकृतीबंधानुसार ४० कर्मचाऱी संख्येला मंजुरी देण्यात आली होती. तर ६ कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे ठरले. परंतु, ठरावानुसार ६ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही. तर ११ ऑगस्ट २०२४ रोजी वार्षिक सर्वसाधारण आमसभेत नवीन शाखा उघडणे आणि कर्मचारी पदभरती करणे असा ठराव मांडण्यात आला होता. त्यावर गोंदिया शिक्षक संघाने त्याचा विरोध केल्याने तो ठराव रद्द करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र पुन्हा मागच्या दाराने ते विषय टाकण्यात आले. याची माहिती गोंदिया शाखेला देण्यात आली नाही. आमगाव येथे नवीन शाखा देखील उघडण्यात आली. आता पुन्हा ३१ ऑगस्ट रोजी पवनी येथे वार्षीक आमसभा होणार असून त्यात तेच विषय ठेवण्यात आले. या निर्णयाचा शिक्षक संघाने विरोध केला. संस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर, शिक्षक संघाचे अध्यक्ष मुबारक सैय्यद यांनी संस्थेला गरीब करून खिसा भरण्याचा घाट घातला. या निर्णयाला गोंदिया जिल्हा शिक्षक संघाचा विरोध असून ते विषय मागे न घेतल्यास आमसभेवर बहिष्कार टाकण्यात येईल. संचालक आणि सभासदांनी देखील या निर्णयाचा कडाडून विरोध करावा, असे आवाहन शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी केले.





