
गोरेगाव,दि.०४ःकर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे व नागरिकांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन गोंदियात दाख्ल झाली आहे.जिल्ह्यात दि.21 ऑगस्ट पासुन आजपर्यंत विविध 9 ठिकाणी आरोग्य संस्थामध्ये कर्करोग तपासणी शिबीरे झाली आहे.आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 32 आरोग्य संस्थेतील गावात मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन द्वारे महिला व पुरुषांची मोफत तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.
या व्हॅनद्वारे शहरासह ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची मोफत कर्करोग तपासणी केली जात आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन एका दिवसात शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी करण्याची क्षमता या व्हॅनमध्ये आहे.आज दि.3 सप्टेंबर पर्यंत गोंदिया तालुक्यातील के.टीएस.रुग्णालय,बीजेडब्ल्यु स्त्री रुग्णालय,पीएचसी रावणवाडी,पीएचसी कामठा,पीएचसी भानपुर व पीएचसी एकोडी असे एकुण 6 आरोग्य संस्था तसेच तिरोडा तालुक्यातील पीएचसी ईंदोरा,पीएचसी बेरडीपार व पीएचसी सुकडी/डाक असे एकुण 3 आरोग्य संस्था असे 9 आरोग्य संस्थातील कार्यक्षेत्रातील तब्बल 1028 लोकांनी मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन मध्ये मोफत तपासणीचा लाभ घेतला आहे.त्यात 677 मुख कर्करोग,208 महिलांची गर्भाशय कर्करोग व 143 महिलांची स्तन कर्करोग संबधाने तपासणी केल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार यांनी दिली आहे.
मोबाईल व्हॅनमध्ये ए.सी.तपासणी कक्ष असून मुख कर्करोगासाठी डेंटल चेअर, स्तन कर्करोगासाठी प्रगत तपासणी यंत्रणा व गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कोल्पोस्कोप यंत्र आहे. गरीब व गरजू रुग्णांसाठी विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जात असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी केले आहे.
निदान व मोफत उपचार प्राथमिक तपासणीत संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील निदानासाठी थेट कर्करोग रुग्णालयात पाठवले जात आहे.कर्करोगाची पुष्टी झाल्यानंतर रुग्णाला शासनामार्फत पूर्णपणे मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांनी दिली.
सदर “मोबाइल व्हॅनमुळे रुग्णांचा मौल्यवान वेळ वाचेल, लवकर निदान होऊन उपचार सुलभ होतील.त्यामुळे नागरिकांनी नियमित तपासणी करून या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी दिली आहे.
दि. 3 सप्टेंबर रोजी मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन गोरेगाव तालुक्यात दाखल झाली असुन दि. 3 रोजी सप्टेंबर रोजी पीएचसी कवलेवाडा, दि. 4 रोजी सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय गोरेगाव, दि. 6 सप्टेंबर रोजी पीएचसी सोनी व दि. 8 सप्टेंबर रोजी पीएचसी तिल्ली मोहगाव येथे आरोग्य शिबीरे आयोजित केले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी केले आहे.





