35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता सार्व.दुर्गाउत्सव मंडपात ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुखाची राकाँ शहर अध्यक्षाला मारहाण

सार्व.दुर्गाउत्सव मंडपात ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुखाची राकाँ शहर अध्यक्षाला मारहाण

0
248

blank

गोंदिया: नवरात्र उत्सव  शांततापूर्ण साजरा होत असताना  गोंदिया जिल्हा शिवसेना (उबाठा) प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे शहर अध्यक्ष यांच्यात मामा चौकातील सार्वजनिक दुर्गा मंदिर मंडपात प्रवेश करण्यावरून राडा झाल्याची घटना २९ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा शिवसेना (उबाठा) प्रमुख, माजी नगरसेवक पंकज यादव हे  पत्नी  व माजी नगरसेविका ललिता यादव यांच्यासह   सार्वजनिक  मंडळात दुर्गा मातेचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. मंडपात प्रवेश करीत असताना त्यांना हवनकुंड निर्माण करण्याचे कार्य सुरू असल्याचे कारण सांगून मूर्तीपर्यंत जाण्यास अडवण्यात आले.त्यांनी अडवणाऱ्याच्या श्रीमुखात हाणली. हे पाहून मामा चौक दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे शहर अध्यक्ष नानू मुदलियार यांनी या वादात मध्यस्थी करीत मंडपात हवन कुंड निर्माण कार्य सुरू असल्यामुळे कुणालाही मंडपाच्या आत प्रवेश करण्यापासून काही वेळेपर्यंत मनाई करण्यात आल्याचे सांगितले.

त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी मुदलियारला मारहाण करीत त्यांच्या समर्थकांनी खुर्ची उचलून त्यांच्या अंगावर फेकली.दरम्यान मामा चौक सार्वजनिक दुर्गा उत्सव समितीच्या इतर सदस्यांनी वेळीच धाव घेत दोघांना शांत केले. पण या सर्व घडलेल्या मारहाण आणि राड्याचे चित्रीकरण मंडपातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपले गेले.राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्षांनी पोलिसात  पंकज यादव आणि त्यांच्या पत्नी  ललिता यादव यांच्या विरोधात तक्रार दिल्यामुळे यादव दांपत्य आणि त्यांचे पाच-सहा समर्थक यांच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गोंदिया शहर पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी दिली आहे.

blank