38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र मुंबई विद्यापीठातर्फे ‘गेट वे ॲाफ इंडिया’ येथे भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई विद्यापीठातर्फे ‘गेट वे ॲाफ इंडिया’ येथे भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन

0
25

blank

४ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

मुंबई, दि. ०१ ऑक्टोबर: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त व विश्व अहिंसा दिनाचे औचित्य साधून समाजात अहिंसा आणि विश्व बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी त्याचबरोबर मूल्याधिष्टित जीवन प्रणालीचे महत्व पटवून देण्यासाठी आज मुंबई विद्यापीठातर्फे बुधवार ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे भजनसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्म समभावाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेची जाणीव निर्माण करण्यासाठी मान्यवर गायक आणि विद्यापीठाच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नावलौकीक कमावलेल्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुमधूर स्वरांनी भजने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सर्वधर्म प्रार्थना, वैष्णव जन तो, आनंदाचे डोही, बाजे मुरलीया बाजे अशी अनेक गीते आणि भजने सादर करण्यात आली.

भजन संध्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर या उपस्थित होत्या. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी डॉ. प्रवीण मुंढे, मुंबई पोलिस उपायुक्त परिमंडळ-१ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमासाठी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, सुप्रसिद्ध गायक चैतन्य देवढे, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक कृष्णा बोंगाणे, ओम बोंगाणे, कौस्तुभ आपटे, सुप्रसिद्ध अभिनेता अजिंक्य ननावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात चार हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग, संगीत विभाग, आजीवन अध्ययन विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि एनसीसी या सर्व विभागाच्या सयुंक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष म्हणजे ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठातर्फे सागरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत मुंबई लगत असलेल्या समुद्री किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेची ३ हजाराहून अधिक मुले सहभागी झाली होती.

blank