
■ ट्रक-दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू तर एक गंभीर
■ देवरी तालुक्यातील शिलापूर ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम पोवारीटोला व ग्राम भोयरटोला गावात शोककळा
देवरी,दि.०१- राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वरील छत्तीसगड मधील सीमा तपासणी नाका परिसरात एका दुचाकीस्वाराने रस्त्यावर जात असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर झाल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे देवरी तालुक्यातील शिलापूर गावात शोककळा पसरली आहे.
मृतांची नावे संजय इन्साराम मानकर (वय २८) रा. पोवारीटोला/शिलापूर व आशिष मधुकर फुन्ने (वय, ३०) रा. भोयरटोला/शिलापूर अशी असून गंभीर जखमीचे नाव शामकुमार भोयर असून त्याचेवर राजनांदगाव येथील इस्पितळात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील ग्राम शिलापूर येथून नवरात्री निमित्त माँ बंम्लेश्वरी देवीचे दर्शनाकरीता डोंगरगडला जात असलेल्या भरधाव दुचाकीची रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली. छत्तीसगड राज्यातील चिचोला सीमा तपासणी नाका परिसरात आज बुधवार( दि..०१) रोजी अंदाजे दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घटली.
प्राप्त माहितीनुसार संजय, आशिष व श्यामकुमार हे तिघेही एकाच दुचाकी क्र. एम.एच. ३५ एक्स ५१७५ ने नवरात्री निमित्त डोंगरगड येथील माँ बंम्लेश्वरी देवीचे दर्शन घेण्याकरिता निघाले होते.यात दुचाकीवरील चालकाचे ताबा सुटल्याने रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.53 वरील छत्तीसगड राज्यातील चिचोला सीमा तपासणी नाका परिसरात समोर असलेल्या ट्रकला मागेहून धडक दिली. या धडकेत संजय मानकर, आशिष फुन्ने हे दोघेही जागीच ठार झाले. तर श्यामकुमार भोयर याला राजनांदगाव येथील रुग्णालयामध्ये उपचाराकरिता हलविण्यात आले. झालेल्या अपघाताची देवरी तालुक्यातील शिलापूर ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम भोयरटोला व पोवारीटोला येथे माहिती गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे




