25.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home Featured News पंतप्रधान असताना कार घेण्यासाठी पाच हजाराचे बँकेकडून कर्ज घेणारे लाल बहादूर शास्त्री

पंतप्रधान असताना कार घेण्यासाठी पाच हजाराचे बँकेकडून कर्ज घेणारे लाल बहादूर शास्त्री

0
26

पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर जून १९६४ मध्ये लालबहादूर शास्त्री पंतप्रधान बनले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ रोजी मुगलसरायमध्ये झाला. त्यांचे नाव लालबहादूर वर्मा. वाराणसीतल्या काशी विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केल्याननंतर त्यांच्या नावापुढे शास्त्री जोडले गेले. जय जवान जय किसानचा नारा देणारे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान पदावर असतानाही त्यांचे पाय जमीनीवर होते. लाल बहाद्दूर शास्त्री हे असे पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या प्रामाणिकपणाचे अनेक दाखले दिले जातात. ते अत्यंत साधे जीवन जगत होते. जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्याकडे कार नव्हती.
१९६४ ची ती घटना, त्यांच्यावरील एका पुस्तकात उल्लेख आहे की, ते पंतप्रधान असताना त्यांच्या मुलाने कार घ्यायचा हट्ट केला. पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक व्ही.एस. वेंकटरमन यांनी चौकशी केल्यानंतर, शास्त्रींना कळले की नवीन फियाटची किंमत १२,००० रुपये आहे. कुटुंबाकडे बँकेत फक्त ७,००० रुपये होते. पंतप्रधानांनी ५,००० रुपयांच्या कर्जासाठी पंजाब नॅशनल बँकेकडे अर्ज केला जो त्याच दिवशी मंजूर झाला. ५,००० रुपयांचे कर्ज काढताना, शास्त्रीजींनी बँक कर्मचाऱ्यांना सांगितले की त्यांना मिळत असलेल्या सुविधा सामान्य नागरिकांनाही मिळाव्यात. पण लवकरच कुटुंबावर आणि देशावर दुःखाचा डोंगर कोसळला. पंतप्रधानांचे ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे निधन झाले, जिथे ते १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या निराकरणाच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यासाठी गेले होते. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी कर्ज माफ करण्याची तयारी दर्शवली, परंतु शास्त्री यांच्या पत्नी ललिता शास्त्री यांनी नकार दिला. शास्त्रींचे निधन झाले तेंव्हा खात्यात फक्त ३६५ रूपये ३५ पैसे होते. शास्त्रींच्या निधनानंतर चार वर्षे ललिता शास्त्री यांनी कारचे मासिक हप्ते भरणे सुरू ठेवले. त्यांनी कारचे कर्ज पूर्णपणे फेडले.
लाल बहादूर शास्त्रींच्या प्रमाणिकपणाचे अनेक किस्से आहेत. त्यांना मिळालेली सरकारी गाडी त्यांचा मुलगा सुनील शास्त्री यांनी काही वैयक्तिक कामासाठी वापरली होती. त्यावेळी शास्त्रींनी त्यांना समज दिली व त्यांनी जेवढी गाडी वापरली होती तेवढ्या किलो मीटरचे पैसे सरकारी खजान्यात जमा केले होते. एकदा उन्हाळ्याच्या दिवसात सरकारकडून शास्त्रींच्या घरात एक कुलर बसवण्यात आला होता. मात्र, नको त्या सवयी लागतील म्हणून त्यांनी तो परत पाठवला होता. गरिबीचे चटके सोसलेल्या शास्त्रींनी त्यांचे जुने कपडे कधीच टाकून दिले नाहीत. जुन्या कपड्यांपासून ते हातरुमाल बनवून घ्यायचे. १९६५ च्या दरम्यान देशानं मोठ्या दुष्काळाचा सामना केला. तेव्हा शास्त्री यांनी देशातील नागरिकांना उपवास करण्याचं आवाहन केलं होत. विशेष म्हणजे शास्त्री यांनी सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबाला उपवास करायला लावला.
१९५६ मध्ये तामिळनाडूत झालेल्या रेल्वे अपघातात १४२ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्री यांनी स्वत:हून रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
आपल्या वेतनाचा मोठा भाग शास्त्रीजी सामाजिक कार्यासाठी आणि गांधीवादी विचारसरणी पुढे नेण्यासाठी करत असत. त्यामुळे त्यांना घरगुती खर्चासाठी पैशांची चणचणही भासे. त्या खर्चाचे बजेट खूप संतुलित ठेवावे लागे.
लालबहादूर शास्त्री आपल्या प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होते. भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी त्यांनी आपल्या कार्यकाळात एक समिती बनवली होती. भ्रष्टाचाराच्या बाबतीत त्यांनी आपल्या मुलालाही सोडलं नाही. मुलाला चुकीच्या पद्धतीने प्रमोशन मिळाल्याचे त्यांना कळले त्यानंतर त्यांनी ते प्रमोशन थांबवले होते. शास्त्रीजींचं व्यक्तिमत्त्व असे महान होते. २ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या साधेपणाचे, प्रामाणिकपणाचे, निष्ठेचे आणि देशाप्रती असलेल्या समर्पणाचे स्मरण केले जाते.
– रुपेशकुमार राऊत
(२ ऑक्टोबर २०२५ – जयंती दिन विशेष)