मुंबई विद्यापीठाला आंतरराष्ट्रीयीकरणातील उत्कृष्टतेसाठी (एक्सक्लेंस इन ग्लोबलायझेशन) फिक्कीचा मानाचा बहुमान
जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन आणि सहकार्य उपक्रमांची दखल
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठास पुरस्कार प्रदान
मुंबई, दि. ०६ ऑक्टोबर: देशातील अग्रगण्य उच्च शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यापीठाला फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) तर्फे दिल्या जाणाऱ्या ११व्या फिक्की उच्च शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार (FICCI Higher Education Excellence Awards २०२५) समारंभात ‘सर्वोत्तम संस्था (एक्सक्लेंस इन ग्लोबलायझेशन) हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारामुळे मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. फिक्कीद्वारे प्रदान करण्यात आलेला सर्वोत्कृष्ट उच्च शैक्षणिक संस्थेचा पुरस्कार सोहळा आज नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठास हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि संशोधन व विकास कक्षाचे संचालक प्रा. फारुक काझी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
फिक्की ही १९२७ साली स्थापन झालेली देशातील सर्वोच्च औद्योगिक संघटना असून, ती शिक्षण, उद्योग, संशोधन आणि धोरणनिर्मिती यांमध्ये सक्रीय भूमिका बजावते. फिक्कीतर्फे शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर सहभाग वाढविणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता उंचावणाऱ्या संस्थांना गौरविण्यात येते. विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय व आंतरसांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी शाश्वत प्रणाली विकसित करणे, परदेशी विद्यापीठे आणि संस्थांशी भागीदारी व सामंजस्य करार करणे, विद्यार्थी आणि प्राध्यापक देवाणघेवाण कार्यक्रम आयोजित करणे, तसेच अभ्यासक्रमामध्ये जागतिक दृष्टिकोन व परदेशी तज्ज्ञांचा सहभाग वाढविणे या निकषावर उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यमापन केले जाते.
मुंबई विद्यापीठाने ग्लोबलायझेशन उपक्रमांतर्गत सादर केलेल्या केस स्टडीजचे पूर्व परीक्षक मंडळ आणि ग्रँड ज्युरी अश्या दोन टप्प्यातील कठोर परीक्षण प्रक्रियेनंतर मुंबई विद्यापीठाला सर्वोत्तम संस्था म्हणून निवडण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाने देशातील नामांकित संस्थांना मागे टाकत हा सन्मान मिळविला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणात मुंबई विद्यापीठ आघाडीवर आहे. दुहेरी, सह आणि ट्विनिंग पदवी अभ्यासक्रमांसह विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी जागतिक स्तरावरील नामांकित विविध २३ उच्च शिक्षण संस्थांशी मुंबई विद्यापीठाचे करार आहेत. क्यूएस रँकिंग, सयुंक्त संशोधन प्रकल्प, इरॅस्मस संशोधन अनुदान, फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम, ग्लोबल लर्निंग सेंटरसह फॉरेन लैंग्वेज सेंटर, इंटरनेशनल डेलीगेशनच्या भेटी, स्टडी इन यूनिवर्सिटी ऑफ मुंबई प्रोग्राम, ५५ हून अधिक देशातील विविध परदेशी विद्यार्थी, कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम, आंतरराष्ट्रीय परिषदांमधील प्राध्यापकांचा सहभाग यासह अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम मुंबई विद्यापीठातर्फे राबविण्यात येतात.
एक्सक्लेंस इन ग्लोबलायझेशन हा पुरस्कार मुंबई विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, जागतिक दृष्टिकोन आणि नवोन्मेषी शैक्षणिक उपक्रमांच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. विद्यापीठाचा हा सन्मान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या “शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण” या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. या मान्यतेमुळे विद्यापीठाच्या जागतिक सहकार्य, संशोधन आणि नवोन्मेषाच्या उपक्रमांना नवे बळ मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जागतिक स्तरावरील संधींचे नवे दालन खुले होईल.
प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ





