नागपूर,दि.२९ः प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या समर्थकांनी आज नागपूरात मोठे रेल्वे रोको आंदोलन सुरू केले आहे. समर्थकांनी सकाळपासून रेल्वे ट्रॅकवर उतरून घोषणाबाजी केली असून संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी २२ मागण्यांसाठी हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगारांना नोकरीच्या संधी, अपंग, विधवा आणि वृद्धांना नियमित अनुदान, तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा यांचा समावेश आहे.
नागपूरमध्ये आंदोलक आणि शेतकरी रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. जामठा स्टेडियम परिसरात शेतकऱ्यांनी हे रेल रोखो आंदोलन सुरु केले होते.यामुळे काही वेळासाठी रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागपूर– मुंबई, नागपूर-चेन्नई रेल्वे ट्रॅक मोकळा केलाय. जामठा परिसरात आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरले होत. दरम्यान, आंदोलकांच्या मागण्या संदर्भात सरकारसोबत चर्चा सुरु असून कुणीही रेल्वे रोको आंदोलन करू नये, असे आवाहन बच्चू कडूंनी केलं होतं. त्यांनतर आंदोलकांनी हे रेल्वेट्रॅक मोकळा केला आहे. परिणामी तूर्तास ‘रेल्वे रोको‘ला ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
बच्चू कडू यांच्या 8 मोठ्या मागण्या:
1) शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी जाहीर करावी.
2) कृषी मालाला हमी भावावर (MSP) 20% अनुदान देण्यात यावे.
3) शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लाऊन 5 लाख रु. अनुदान द्यावे.
4) पेरणी ते कापणीचा सर्व खर्च MREGS मधुन करावा.
5) नागपुर – गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा.
6) दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे-
7) मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे
8) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा.
नागपूर रेल्वे स्थानकासह परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, सरकारकडून वारंवार आश्वासन मिळूनही ठोस निर्णय होत नसल्याने त्यांनी ‘रास्ता रोको’ आणि आता ‘रेल्वे रोको’ आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी २१ तासांसाठी राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला होता. या पार्श्वभूमीवर नागपूर आणि आसपासच्या भागात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासन आणि रेल्वे विभागाने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज उग्र वळण मिळाले आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी आज सकाळी समृद्धी महामार्गावर आक्रमक पवित्रा घेत टायर, लाकूड आणि ज्वलनशील साहित्य जाळत आंदोलन छेडले. त्यामुळे काही तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
अशातच आता आंदोलकांच्या मागण्या संदर्भात सरकारसोबत चर्चा सुरु असून कुणीही रेल्वे रोको आंदोलन करू नये, असे आवाहन बच्चू कडूंनी केलं आहे. तर आज 4 वाजताच्या सुमारास राज्याचे गृहराज्य मंत्री पंकज भोयर आणि अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडूंशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आता गृहराज्यमंत्री आणि अर्थ राज्यमंत्र्याच्या शिष्ठाईला यश येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





