30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home Top News तीन चिमुकल्यांच्या अकाली मृत्यूने खेडेगावावर पसरली शोककळा

तीन चिमुकल्यांच्या अकाली मृत्यूने खेडेगावावर पसरली शोककळा

0
6

कुरखेडा : तालुक्यातील मौजा खेडगाव येथे शनिवार (दि.1) दुपारी शाळेतून परत येताना सती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांपैकी तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे खेडेगावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबियांच्या टाहोने संपूर्ण गाव हळहळले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार कृष्णा गजबे यांनी तातडीने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन मृत मुलांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. या दुर्घटनेवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी तीव्र दुःख व्यक्त करत नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढे, तलाव आणि इतर जलस्रोतांतील पाणीपातळी वाढली असून अशा ठिकाणी जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे गांभीर्याने पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

खेडेगावमधील लक्ष्मण सुनेर दुधकंवर (वय 12 वर्षे), कुणाल नरेश दुधकंवर (वय 11 वर्षे) आणि कोहित युवराज सराटे (वय 13 वर्षे) यांच्यासह आविश विनोद आमले हे चार मित्र गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होते. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर त्यांनी नदीवर जाण्याचा बेत केला. अतिवृष्टीनंतर नद्यांची पाणी पातळी वाढलेली असल्याने या मुलांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे आविश वगळता तिघेही मुलं पाण्यात बुडाली. आविशने प्रसंगावधान राखत स्थानिक नागरिक व मच्छीमार यांना या घटनेची माहिती दिली. स्थानिक यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य व इतर आवश्यक कार्यवाही सुरू केली. पण काही वेळात तिघांचेही मृतदेहच हाती लागले.

पालकांनो, काळजी घ्या- गजबे

या दुर्घटनेनंतर माजी आमदार कृष्णा गजबे यांनी पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मृतदेहांचे शवविच्छेदन व इतर कायदेशीर प्रक्रिया लवकर पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत गजबे यांनी पावसाळ्यात नदी-नाल्यांच्या वाढत्या प्रवाहामुळे पालकांनी लहान मुलांना नदी-नाल्यावर पाठवू नये. त्यांना एकटे न पाठवता विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक रवींद्र गोटेफोडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात नदी, नाले, तलाव, बंधारे, खाणीतील पाणीसाठे व इतर जलाशयांमध्ये पोहण्यासाठी किंवा आंघोळीसाठी जाऊ नये. पुलावरून किंवा रस्त्यावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत वाहन किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये. पाण्याचा वेग आणि खोलीचा अचूक अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता वाढते. नागरिकांनी कोणताही धोका पत्करू नये. प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. विशेषतः पालकांनी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवून त्यांना जलस्रोतांपासून दूर ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.