26.9 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home Top News आम्ही मागे हटणार नाही, आमची व्यवस्था जेलमध्ये करावी – कडू

आम्ही मागे हटणार नाही, आमची व्यवस्था जेलमध्ये करावी – कडू

0
118

नागपूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी महाएल्गार ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.28 तारखेपासून सुरु झाल्यानंतर आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. ठिय्या आंदोलनामुळं होणाऱ्या प्रवाशांच्या गैरसोईची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सुमोटो दखल घेतली आहे. बच्चू कडू यांनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत स्वतःला आणि स्वतःच्या आंदोलन सहकाऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू असलेल्या स्थळावरून बाजूला व्हावे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे.

कोर्टाचा आदेश घेऊन पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी बच्चू कडू यांना भेटले. यामध्ये पोलिसांच्या स्पेशल ब्रॅचचे डीसीपी सातव यांचा समावेश होता.बच्चू कडू यांनी तुम्ही डरपोक, कोर्टाला समोर करता,जेल कमी पडेल, अटक करा,आता रामगिरी ताब्यात घेऊ, असा इशारा दिला. तर, पोलिस अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या आदेशाची प्रत बच्चू कडू यांना दाखविली.

बच्चू कडू यांना आंदोलनासाठी 28 ऑक्टोबर साठीची आणि तीही परसोडी गावाजवळच्या मैदानावरील आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती.ती परवानगी 28 तारखेसाठी होती. मात्र, ठिय्या आंदोलन आज म्हणजे 29 तारखेला ही सुरू आहे आणि त्यामुळे लोकांना खास करून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्रास होत आहे.परिसरात अनेक रुग्णालये सुद्धा आहेत. अनेक रुग्णांना त्रासाचा सामना करावा लागला आहे, असे सुद्धा नागपूर खंडपीठाच्या आदेशात म्हणण्यात आले आहे.

बच्चू कडू यांनी आम्ही कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणार नाही, असे म्हटले. मात्र, जर आंदोलन करायला आलेले सोबतचे लोक  आंदोलन सुरू ठेवायचे आहे असे म्हणत असेल तर आम्ही आंदोलन सुरू ठेवू, असे बच्चू कडू म्हणाले. आता लोक न्यायालय आणि विधी न्यायालय यांच्यातला हा संघर्ष आहे. आम्ही न्यायालयाचा अवमान करणार नाही. मात्र, लोक न्यायालयाचे ऐकणे सोडणार नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

कोर्टाचा आदेश आला आहे, टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीवरून न्यायालयाने  आदेश काढला. मात्र, रोज शेतकरी आत्महत्यांच्या बातम्यांवर कोर्ट दखल घेत नाही. न्यायालय शेतकरी मृत्यूची दखल घेत नाही, आता आम्ही न्यायालयाबद्दल विचार करू. आम्ही इथून हटायला तयार आहोत आमची जेलमध्ये नेण्याची व्यवस्था करावी, असे बच्चू कडू यांनी म्हटले. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतो, आम्हाला जेलमध्ये घेऊन चला. आम्ही पोलिसांच्या कृतीची वाट पाहू. न्यायालयाचा अवमान आम्ही करू इच्छित नाही. पोलिसांनी जबाबदारी पूर्ण करावी, कार्यकर्ता पोलीस सांगतील त्या गाडीत बसायला तयार आहे, असेही बच्चू कडू यांनी म्हटले. जरी यांनी कमरेचं सोडलं असलं तरी आम्ही कमरेचं सोडलेला नाही. पोलिसांनी एक-एक करून आम्हाला ताब्यात घ्यावे आणि जेलमध्ये घेऊन जावे. आम्ही कोणीही इकडे-तिकडे जाणार नाही, थेट पोलिसांच्या गाडीत जाऊन बसायचे, असे बच्चू कडू यांनी आंदोलकांना सांगितले.