मजीप्रा संघर्ष कृती समितीचे आंदोलन यशस्वी; मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत लढा सुरूच राहणार
प्रतिनिधी / मुंबई: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (मजीप्रा) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वित्त विभागाकडून अडथळा निर्माण केला जात असल्याचा गंभीर आरोप करत, ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समिती’च्या वतीने आजपासून, सोमवार (दि. ३ ऑगस्ट २०२६) पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) संघर्ष कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे ३०० हून अधिक सभासदांनी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तीव्र निदर्शने करून आजचे आंदोलन अत्यंत यशस्वी करून दाखवले. हे आंदोलन बेमुदत स्वरूपाचे असल्याने, सर्व प्रलंबित मागण्या पूर्णपणे मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत ते मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे.
आंदोलनाची पुढील दिशा आणि तीव्रता वाढवण्यासाठी उद्या सकाळी रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरातील सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा लढा यशस्वी करावा, असे जाहीर आवाहन मजीप्रा संघर्ष कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबईतील आझाद मैदानातील मुख्य उपोषणासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील मजीप्रा कार्यालयांसमोर कर्मचारी धरणे आंदोलन करण्यात आल्याचे कळविण्यात आले.आंदोलनात यशरथ पिपरे (नागपूर), प्रशांत जोग (नाशिक), प्रांत पांढरपट्टे (ठाणे), सल्लागार राजू सोनार, आनंद भालादरे, राजेश कानडे पाटील, सरताज सिंह चहल, अनिल इंगोले,गोंदिया येथून संजयकुमार कटरे, सुरजलाल पटले, देवेंद्र खापेकर, राजु खैरे, दिनेश तुरकर, सोयाम, प्रभु वाघाये व स्थानिक कर्मचारी प्रतिनिधींनी सहभागी झाले होते.
प्रमुख मागण्या:
कॅबिनेट निर्णय व शासन निर्णयाची पायमल्ली करणाऱ्या मजीप्राच्या वित्त संचालक व वरिष्ठ लेखाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे.
रोखून धरलेले निवृत्तीवेतन व इतर सेवांतर्गत लाभ त्वरित लागू करावेत.
कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन टिपणीची चौकशी करण्यात यावी.
“सभासदांची ही एकजूट आणि दिलेला मोठा प्रतिसाद कौतुकास्पद आहे. मागण्यांचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत हा लढा असाच ठामपणे सुरू राहील.”
— अरुण निरभवणे (अध्यक्ष) व गजानन गटलेवार (सरचिटणीस), मजीप्रा संघर्ष कृती समिती





