
बिडगांव नगर पंचायतमध्ये साढे तीन हजार बोगस मतदार प्रकरण
नागपूर : बिडगांव नगरपंचायतमध्ये बोगस मतदानाच्या आधारे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने केला असून, भाजपचे नागपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाल्या उर्फ नरेंद्र बोरकर यांनी बिडगांवमध्ये येऊन दादागिरी केली,जी आम्ही हाणून पाडली.परंतु सत्ताधा-यांनी आमच्यावर गंभीर गुन्हे दाखल केल्याची माहिती प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी दिली. २ डिसेंबर रोजी बोगस मतदानाला रोखण्याचे चोख काम आमचे प्रत्येक उमेदवार,प्रतिनिधी व समर्थकांनी, सैनिकांप्रमाणे केल्याचे अवंतिका यांनी सांगितले.यावेळी आम्ही भाजपच्या बोगस मतदानाचा डाव हाणून पाडण्याचा निर्धारच केला होता.मैदानात निष्पक्ष लढाई झाली पाहिजे.लोकशाहीत निवडणूका या पारदर्शीच पार पडल्या पाहिजे.यात आमचा विजय झाला तरी आम्हाला मान्य आहे,पराभव झाला तरी आम्हाला तो स्वीकार्य आहे.परंतु,कुटील कारस्थाने करुन भाजपला विजयी होऊ द्यायचं नाही,हा प्रण आम्ही सर्वांनी केला व त्याप्रमाणे २ डिसेंबरला भाजपच्या बोगस मतदानाला आम्ही थांबवले. परंतु बिडगावमध्ये वार्ड क्र.६ मध्ये जे बोगस मतदान होत होते त्याला आम्ही रोखले व बोगस मतदारांना परत पाठवले.भंडारा जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील मिट्टेवाणी या गावात होत होते आणि गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील जमन्या या गावाचं देखील बोगस मतदान आम्ही रोखलं.या मतदारांना परत पाठविले असता भाजपच्या नागपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकाने,जो भाजपचा पदाधिकारी आहे की ‘गुंड’आहे,ही शंका आम्हाला आहे,कारण अश्या प्रकारे ग्रामीणचं मतदान सुरु असताना,नागपूर शहरातील भाजपच्या नगरसेवकाने मतदान केंद्रात शिरुन बाहेरच्या बोगस मतदारांना,निवडणूक कर्मचा-यांना दमदाटी करुन मतदान करण्यास भाग पाडले,असा आरोप लेकुरवाळे यांनी केला.





