
अर्जुनी/मोर.-नगर पंचायत अर्जुनी/मोर अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने सुरू असलेल्या उपोषण आंदोलनास अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
नगरातील घनकचरा संकलन, दैनंदिन स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी स्वच्छता कर्मचारी नियमितपणे पार पाडत आहेत. मात्र, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ या सलग चार महिन्यांचे वेतन अद्यापही अदा करण्यात आलेले नाही. परिणामी वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, घरखर्च व वैद्यकीय गरजा भागविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नगर पंचायत अर्जुनी/मोरचे मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी केल्या. मात्र, निवेदन सादर करून पंधरा दिवस उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतन सॅलरी अकाउंटवर जमा होत असतानाही कंत्राटदाराकडून मिळणाऱ्या किमान वेतनातून अर्धा पगार परत घेण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अर्धा पगार न दिल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. हा अन्यायकारक प्रकार सन २०२० पासून सुरू असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या या अन्यायाविरोधात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पुढे आली असून, त्यांच्या उपोषण आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. थकीत वेतन तात्काळ अदा करावे, कंत्राटदाराकडून होणाऱ्या शोषणास आळा घालावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा परिषदेतर्फे देण्यात आला आहे.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ सहसचिव साहिल मडावी, शहर अध्यक्ष सौ. भुमेश्वरी भलावी, जिल्हा अध्यक्ष मंगेश भलावी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते दिलवर रामटेके, दिपक वलथरे, रामू कुटारे, प्रविण शहारे, भुषण उंदीरवाडे, मुकेश पर्वते, गोविंदा गजभिये, नामदेव नैताम, तुकाराम नैताम, प्रमोद लाडे, दामोदर चौधरी, कैलास शहारे, शेखर कुर्झेकर, विक्की पशिने, विकास बर्वे, सुनील ईलमे, शुभम कुटारे, आम्रपाली शहारे, दर्शना बडोले आदी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





