धैर्यवान जिजाऊ,
दयाळू सावित्री
समाजसेविका फातिमा…
3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते 12 जानेवारी राजमाता माॅसाहेब जिजाऊ जयंती तसेच 9 जानेवारी समाजसेविका फातिमा शेख जयंती.3 ते 12 जानेवारी या दहा दिवसाच्या कालावधीत तीन महानायिकांच्या कार्याचा ,विचारांचा जागर करणे आजची गरज आहे, जिजाऊ ब्रिगेड दसरात्री उत्सव महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेर साजरा करते. या दसरात्रोत्सव निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,समाजसेविका फातिमा शेख यांच्या विचार,कार्यांना समजणे व त्यांचा आदर्श, प्रेरणा महिलांनी घेणे आवश्यक आहे, स्त्री शिकले, कुटुंबात, समाजात पुरुषांच्या बरोबरीने काम करते, कमवते परंतु स्त्रिया आजही स्वतःला पाहिजे तसे तयार करीत नाही,
प्रत्येक महिलेने स्वतःला काळाच्या पुढे जाऊन वर्तमानातील व भविष्यातील प्रत्येक क्षेत्रासाठी अपडेट करणे अगदी शंभर टक्के तंतोतत कार्यपद्धती व जीवनपद्धतीचे नियोजन केले पाहिजे , अत्यंत क्रांतिकारी विचार पण व्यवहारी दृष्टिकोन आचारणारी ,कृतिशील ,परिवर्तनवादी ,अचूक जीवनशैली ,सतत हसतमुख व प्रसन्न चेहऱ्याने कुटुंब समाज तसेच जगभर वावर, प्रचंड आत्मविश्वास , स्वाभिमान, ज्ञानधारी, समाजाभिमुख, परोपकारी ,कुटुंब व समाज वत्सल, कुटुंबप्रमुख ,विज्ञानवादी ,समतावादी ,मानवतावादी विचारधारा जोपासणारी व आचारणारी कणखर महिला जिजाऊ ब्रिगेड च्या मनात आहे.
धर्म म्हणजे व्रत, वैफल्य, उपवास, पूजा ,आरती ,देव देऊळ अशा भाकड अंधश्रद्धा ,कर्मकांडाच्या बाबी नसून मानवी जीवन अत्यंत सुखदायी ,समृद्ध ,सुरक्षित ,शांतता माय व्हावे यासाठी प्रत्येकाने आपले आचारविचार ठेवणे ,त्रिकालबाधित जे सत्य असेल ते स्वीकारणे ,वर्तमानात सत्य ठरणारे परिवर्तनवादी विचार अमलात आणणे .विज्ञानाचा विकास म्हणजे मानवाची संशोधक, चिकित्सक वाटचाल. त्यातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा मानवी सुखासाठीचा वापर म्हणजे धर्म.
कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक भगिनी वैयक्तिक पातळीवर शारीरिक, मानसिक ,आर्थिक व आध्यात्मिक क्षेत्रात परिपूर्ण असणे गरजेचे आहे .
*व्यक्ती व्हावी कुटुंब पूरक* *कुटुंब व्हावे समाज पोषक*
*तैसेची ग्राम व्हावी राष्ट्र सहाय्यक*
*राष्ट्र विश्वशांतीदायी*
(ग्रामगीता)
प्रगल्भ ,प्रतिभावंत महिला होण्यासाठी जिजाऊ सावित्री महिलांना समजले पाहिजे, आजच्या स्त्रियांना मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणे, पोटभर जेवू घालणे, त्यांना संस्कारी बनवणे हेच मोठे आवाहन वाटते आव्हान वाटते .
*राष्ट्रमाता माॅ जिजाऊसाहेब*
बुलढाणा मधील सिंदखेडराजा येथील पराक्रमी सरदार लखुजी जाधव आणि स्वाभिमानी म्हाळसाबाई यांना 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊ कन्या झाली .निजामानी लखुजीराजांना देशमुखी बहाल केली .आणि आपल्या जहागिरीत न्याय व शिस्त निर्माण केली. समतेची वागणूक देणे हेच उद्दिष्ट होते ,या सर्व बाबींचे बाल जिजाऊ वर संस्कार झाले बालपणीस दांटडपट्टा ,तलवार चालवायची ,लढाई खेळायची, घोड्यावर बसायची, चिलखत घालायची ,कट्यार कमरेला लटकवायची .
भोसले घराण्यातील पराक्रमी व कर्तबगार शहाजी राजे यांच्या सोबत वयाच्या सातव्या वर्षी जिजाऊंचे मोठ्या थाटामाटात लग्न झाले ,या लग्नामुळे मराठे शाहीतील दोन मातब्बर घराणे एकत्र आले ,सासरे मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले .भोसले जाधव घराण्यात वितुष्ट निर्माण झाल्याने जिजाऊस माहेर पोरखे झाले,निजामशाहीतील कटकारस्थाना मुळे पितृछत्रही हरपले, शहाजीराजांना वारंवार मोहिमेवर जावे लागत असे त्यांच्या माघारी जिजाऊ पुणे व सुपे येथील जहागिरीच्या कामात जातीने लक्ष घालीत *आपले स्वतःचे राज्य असावे* हे स्वप्न शहाजी व जिजाऊंचे होते.
जिजाऊ गर्भावस्थेत असतानाचा काळ अत्यंत धकाधकीचा व अशांततेचा होता, स्थैर्य असे नव्हतेच, जिजाऊंचे प्रसूती कार्य व्यवस्थित व्हावे म्हणून शहाजीराजांनी जिजाऊ ला शिवनेरी किल्ल्यावर आणले, जिजाऊंचे डोहाळे सामान्य स्त्रियांसारखे नव्हते त्यांना हत्ती ,घोड्यावर बसावे, अन्याय अत्याचाराचा नाश करावा ,स्वराज्याची निर्मिती करावी, किल्ले बांधावे, गड जिंकावे, लोकांना शांततेने व सुव्यवस्थेने जगता यावे, मुक्त हस्ते दान करावे, स्वधर्माचे रक्षण करावे असे होते ,19 फेब्रुवारी 1630 रोजी त्यांच्या पोटी शिवाजी जन्मास आले, शिवाजी महाराजांचे आद्य गुरु या माॅसाहेब जिजाऊ होते,
1631 साली विजापूरकडील मुरारी पंडिताने उध्वस्त केलेले पुणे जिजाऊने पुन्हा उभे केले ,शिवबाला शिक्षण दिले, सभोवतालच्या सैतानी राजवटीची आणि आपल्या असह्य लाचार प्रजेची त्यांना जाणीव असल्यामुळे सशक्त मराठा सत्ता निर्माण करण्याचा अंकुर बाल शिवबा मध्ये टाकत होत्या, युद्ध कला ,अश्वरोहन , शिकू लागले, शेतकऱ्यांची मुले शिवबांचे सवंगडी बनले, स्वराज्याचे महत्त्व ,मित्रपरिवार मावळ्यांना जमवुन सांगितले,
व सोळाशे त्रेचाळीस मध्ये रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, मनुष्यबळ, द्रव्यबळ, शस्त्रबळ जमवू लागले ,कुस्ती, तलवारबाजी, दांडपट्टा भालाफेक, धनुष्यबाण यासारखे शस्त्रे चालवण्यासाठीचे शिक्षण कुशल शिक्षका मार्फत दिले, या सर्वांवर जिजाऊंची मायेची नजर होतीच शिवाजजीसह सर्व मा जिजाऊंच्या आज्ञेत वागत ,जिजाऊ महत्त्वाच्या कार्यात बाल शिवबास आपल्याजवळ ठेवत.
जिजाऊंना स्त्रीची बेअब्रू करणाऱ्यांची भारी चीड होती ,शिवाजी एक आदर्श पराक्रमी छत्रपती राजा व्हावा यासाठी रात्रदिवस झटत होत्या ,जिजाऊमुळे शिवाजी राजे रयतेशी वागणूक, कार्यपद्धती व निष्ठा ,अनुशासन, प्रजा वत्सलता, न्यायप्रवृत्ती ,संयम, धर्मपरायणता ,प्रसंगी धीटपणा सर्व गुणसंपन्नता ,चाणाक्ष बुध्दी शिकत होते,
जिजाऊ, एक वीरकन्या वीर पत्नी आणि वीर माता होत्या २३ जानेवारी १६६४ रोजी शहाजीराजे मरण पावले,जिजाऊंचे पतीछत्र हरपले मात्र त्यांनी धीर न सोडता शिजाजीराजांना तयार केले ,धाडसी महिमा मधून राजकीय मार्गदर्शन केले, शिवाजी राजे मोहिमेवर असताना ज्या पद्धतीने त्यांनी राज्यकारभार सांभाळला त्यावरून त्यांची जनसेवा ,सामान्य बुद्धिमत्ता दिसून येते ,शिवाजी राजे व संभाजी राजे या दोन छत्रपतींना घडविणाऱ्या जिजाऊ छत्रपतींचा राज्याभिषेक त्यांनी वयाच्या 76 व्या वर्षी पाहिला, “आज धन्य कृतार्थ जाहले” म्हणून शिवराज्याभिषेकानंतर बाराव्या दिवशी १७ जून 1674 रोजी राजमाता जिजाऊंनी आपले प्राण सोडले ,मासाहेब जिजाऊंना त्रिवार वंदन…
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले..*
महाराष्ट्रात शिवशाहीनंतर पेशवाई आली, ती अन्यायकारक होती, स्त्रियांची स्थिती फारच वाईट होती ,शिक्षण घेणे ,ज्ञान संचय करण्याचा अधिकार सर्व जातीतील स्त्रियांना नव्हताच ,पायात चपला घालण्याचा अधिकार त्यांना नव्हता ,वयोवृद्धांशी लहान मुलींची लग्न लावून दिले जात होते त्यामुळे महिला कमी वयातच विधवा होत, मुलगी जन्म म्हणजे पाप समजले जाईल ,नवरा मरण पावला तर स्त्रीला दोष देऊन तिला सती जाण्यासाठी सक्ती करत ,इंग्रज सरकारने सती प्रथा बंद केली परंतु विधवेचे जीवन हे यातनादायी होते अशा कर्मठ धार्मिक, सामाजिक व राजकीय वातावरणात 3 जानेवारी 1831 मध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला ,निरोगी, धाडसी सावित्री शेतामध्ये जाई,गुरे सांभाळणे गाई -म्हशीचे दूध काढणे ही कामे सावित्री आनंदाने करी, 1840 मध्ये ज्योतिबांशी लग्न झाले ,ज्योतिबा ,सावित्री, सासरे गोविंदराव व सगुणाबाई
असे चौघे राहायचे ,त्यांचा फुलांचा व्यवसाय होता, ज्योतिबा गावातल्या शाळेत शिकत होते ,तु जेजे शाळेत शिकते ते सावित्रीला घरी शिकव सगुणाबाईनी सांगीतले,सावित्रीबाई सगुणाबाई यांना ज्योतिबांनी घरीच प्राथमिक शिक्षण दिले नंतर सावित्रीबाई यांना अहमदनगर येथे फरार बाईच्या शाळेत व पुढे पुण्यात मिचेलबाईच्या नॉर्मल स्कूलमध्येअध्यापनाचे प्रशिक्षण घेतले ,ज्योतिबांनी 1847 मध्ये शाळा काढली तीन महिन्यात ती बंद पडली, ज्योतिबा बेचैन झाले नंतर सभा घेतली ,या सभेने महाराष्ट्राच्या शिक्षणाचा इतिहास बदलला, जोतिबा म्हणत स्त्रियांच्या सर्व दुःखाची मुळे ही कोणती असतील तर ती पितृसत्ताक पद्धती आहे ,कुटुंबाची सत्ता, समाजातील सत्ता यांच्या संबंधात आहे ,महिला हीन दर्जाच्या आहेत हे पुरुष सत्ताक व्यवस्थेत पक्का झालेला सिद्धांत आहे ,जोतिबानी स्त्रियांना शिक्षित केले पाहिजे म्हणून 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा काढली ,सावित्रीबाई ज्ञानदानाचे कार्य करू लागले, सहा मुलींनी शाळेत प्रवेश घेतला ,लपून छपून मुली शाळेत येई,कर्मठ लोकांनी शाळा बंद पडण्याचा कट रचना सावित्रीवर दगड ,शेण ,चिखल, पाणी फेकले तरी सावित्रीने शिकविण्याचे काम बंद केले नाही ,तर, सासरे गोविंदराव यांना तुमचा मुलगा सुंन धर्मद्रोह करतो आहे म्हणून कान भरले गोविंदा रावनी शिक्षण सोडा किंवा घर सोडा असा फर्माण काढला, घर सोडले पण शिक्षण देणे थांबवले नाही कारण *अज्ञान नावाच्या आपल्या शत्रूला हकलायचे असा निर्धार* सावित्रीने केला ,समाजकार्यासाठी घरदार सोडणारे पहिले फुले दांपत्य होय, 1851 -52 मध्ये मुलींच्या पुण्यात तीन शाळा काढल्या विनावेतन काम करणाऱ्या सावित्री शिक्षिका होत्या 4 वर्षात 18 शाळा सुरू केल्या, सावित्रीबाईच्या शाळेतील मुली फार हुशार होते , 1953 मध्ये 237 मुलींनी परीक्षा दिली होती ,16 नोव्हेंबर 1852 रोजी ब्रिटिश सरकारने जोतिबांचा सत्कार केला , ज्योतिबांनी त्यांच्या गळ्यात पडलेला पुष्पहार काढुन सावित्रीच्या गळ्यात घातला, कारण ज्योतिबा म्हणतात शिक्षण कार्याचे कौतुक माझे नसून सावित्रीचे आहे, हे श्रेय त्यांना मिळायला हवे ,ज्योतिबा खरे स्त्रीपुरुष समानतेचे खरे पाईक होते,
1863 मध्ये विधवा काशीबाईनी बाळाची हत्या केली तिला काळ्यापाण्याची शिक्षा झाली, बाल हत्या रोखण्यासाठी सावित्रीबाई यांनी 28 जानेवारी 1853 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह काढले,विधवाश्रम काढले, शंभर विधवा महिलांची आई होऊन त्यांची बाळंतपण केली .तेव्हा 14 विधवा चार वर्षाआतील होत्या अशा विधवा अन्यायाला बळी पडत त्यांना सावित्रीने आधार दिला, सावित्रीला स्वतःचे मुल नव्हते यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला त्याला शिकवले डॉक्टर केले, सुनबाईला पण शिकवले, विधवा विवाह सभा ही भारतातली स्त्रियांची पहिली संघटना असावी ,त्यावेळी विधवा पुनर्विवाह सावित्रीने लावून दिला, त्यावेळी विधवांचे केशव पण करायचे ही वाईट प्रथा होती नाभिकांना सावित्रीबाईंनी संप करायला लावला, त्यांना ही प्रथा किती क्रूर आहे हे समजावले आणि नाभिकांनी संप केला केशवपण करणार नाही म्हणून बहिष्कार टाकला, 1868 मध्ये घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला ,सत्यशोधक समाज स्थापन करून त्या अंतर्गत अनेक कार्य केले ,वाईट प्रथांविरोधी आवाज उठवला ,1876 मध्ये दुष्काळ पडला त्यावेळी अन्नक्षेत्र काढली स्वतः भाकरी करून इतरांचे पोट भरत होत्या, 1896 मध्येही दुष्काळ पडला ,सावित्रीबाई गावोगाव फिरून दुष्काळावर मात करीत होत्या, 28 नोव्हेंबर 1890 मध्ये ज्योतिबांचे निधन झाले . टिटवे कोण धरणार म्हणून त्यांचे नातेवाईक गोंधळ घालत होते ,टिटवे धरणारा वारसदार म्हणून गणला जाईल असे त्यांना वाटत होते,यशवंत ला विरोध केला, सावित्रीबाई त्याही परिस्थितीत न डगमगता ध्यैर्याने टिटवे एका हातात व दुसऱ्या हातात यशवंतला घेऊन अंतयात्रे पुढे चालतात, स्वतः अग्नी देतात , *भारताच्या इतिहासात पतीच्या पार्थिवाला पत्नीने अग्नी देण्याची बहुदा ही पहिलीच* वेळ असावी,
सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळली, सावित्रीबाई या कवयित्री होत्या काव्य फुले, काव्यसंग्रह हा त्यांचा प्रसिद्ध आहे, 1896 दुष्काळा पाठोपाठ 1897 मध्ये प्लेगची साथ पुणे परिसरात पसरली ,त्यामध्ये सावित्रीबाईंनी मिशनरयांना भेटी दिल्या, सरकारच्या रॅंड या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्लेगविरोधी अभियान सुरू केले, गावोगावी फिरून जनजागृती करत होते, डॉक्टर यशवंतला गावाकडे बोलवून घेतले दवाखाना सुरू केला , प्लेगची लागण मात्र कमी होत नव्हती, पुण्याजवळील मुंढवे गावात पांडुरंग गायकवाड या अस्पृश्य मुलाला प्लेगची लागण झाली ही बातमी सावित्रीला कळताच वारयाच्या वेगाने सावित्रीबाई धावून गेल्या त्याला पाठीवर घेतले ,यशवंतच्या दवाखान्यात आणत असताना त्यांना प्लेगची लागन झाली त्यामध्ये 10 मार्च 1897 रोजी क्रांतीज्योतींनी आपली पाठ जमिनीला टेकली ,डोळे मिटले सावित्रीबाई नावाची धगधगती मशाल या समाजातील अज्ञान ,अंधकार, विषमता गुलामगिरी या विरोधात सुमारे 50 वर्ष अथकपणे संघर्ष आणि सेवा करीत हजारो लाखो लोकांच्या जीवनाला प्रकाश देऊन गेली अशा दयाळू सावित्रीबाईला त्रिवार वंदन..
*समाजसेविका फातिमा शेख*
सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले हे शिक्षण कार्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर त्यांचा मुस्लिम समाजातील मित्र उस्मान शेख यांनी त्यांनाआपल्या राहत्या घरातील जागा व संसार उपयोगी भांडीकुंडी अधिवस्तू दिल्या ,शाळा सुरू होते, शाळेमध्ये येणारे विद्यार्थी अतिशय गरीब असल्यामुळे फी देण्याची त्यांची क्षमता नव्हती ,पहिली मुलींची शाळा बंद पडली मित्राच्या मदतीने सावित्रीबाईंना पुढील शिक्षण व त्याचबरोबर सावित्रीबाई सोबत शाळा मधून शिकण्यास उपयोगी होतील अशा काही तरुण स्त्री शिक्षकांचा वर्ग घेण्याचे ठरले ,बरीच खटपट करून पुण्यात स्त्रिया जमवून त्यांना शिक्षण दिले याच शाळेत उस्मान शेख यांची बहीण फातिमा शेख यांनीही शिकवण्याचे प्रशिक्षण घेतले होते ,नव्याने शाळा सुरू करताना सावित्रीबाईंना फातिमा शेख या मुस्लिम समाजातील सहकारी शिक्षिकेची सोबत होती 1953 मध्ये . *फातिमा शेख* या 19 व्या शतकातील *भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका* होत्या त्यांचा जन्म 9 जानेवारी 1831 मध्ये झाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण कार्यात त्यांनी मोलाची साथ दिली, शिक्षणाच्या प्रचारासाठी त्यांनी दारोदार जाऊन काम केले आणि समतावादी विचारांचा प्रसार केला ,अशा महान समाजसेविका फातिमा शेख यांना त्रिवार वंदन…
जय जिजाऊ, जय सावित्री…
वर्षा ज्ञानदेव ठाकरे( भगत)
कारंजा लाड




