भारतीय समाजाच्या जडणघडणीत आजपर्यंत अनेक समाजसुधारकांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे, त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. ज्या समाजात स्त्रियांनी शिकणे पाप मानले जात होते, विविध अनिष्ठ रुढी-परंपरामध्ये हा समाज अडकून पडला होता, त्या समाजात सावित्रीबाईंनी शिक्षणाची मशाल हातात घेत विरोधक, अपमान व वाटेतील अनेक संकटांचा सामना करत शिक्षण, स्त्रीसमानता, सामाजिक न्याय आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित एक सशक्त चळवळ उभी केली. या सर्व शक्तींना एकत्रित करत त्यांच्या विचारांना नवी वैज्ञानिक दिशा देत त्यांना संघटित कृतीकडे प्रवृत्त करत समाजबदल घडवून आणणे, हे सावित्रीबाईंच्या संघटक व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. आणि म्हणूनच सावित्रीबाई फुले यांचे कार्य एक श्रेष्ठ संघटकाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
एका उत्कृष्ट संघटकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे धैर्य आणि भविष्यात येणारे संभाव्य धोके सहन करण्याची वृत्ती. १९ व्या शतकातील भारतीय समाज हा अत्यंत रुढीवादी, कर्मकांड, जातीवाद, पुरुषप्रधान असा होता. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हताच पण शूद्र-अतिशूद्र समाज तर अज्ञानाच्या अंधारातच हेतुपुरस्सर ठेवला जात होता. सामाजिक अन्यायाला धार्मिक आधाराची जोड देत अन्याय अत्याचाराची चक्र सुरू होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी समाज परिवर्तनाचे कार्य हाती घेतले व नियोजनबद्ध संघटना उभारून उत्कृष्ट समाज व्यवस्थापन केले.
सावित्रीबाई व ज्योतिराव फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली व सावित्रीबाई आद्य भारतीय शिक्षका झाल्या. त्यांनी सुरू केलेल्या शाळा यशस्वीपणे चालवणे ही मोठे आव्हान होते. समाजाचा विरोध टीका अपमान आणि धमक्या यांचा सामना करताना त्यांनी शिक्षक पालक आणि समाजसुधारक यांना एकत्र आणले. शिक्षण ही सामाजिक गरज आहे हा विचार लोकांच्या मनात रुजवण्यासाठी त्यांनी सातत्याने संवाद साधला. शिक्षणाभोवती त्यांनी एक मजबूत शैक्षणिक संघटना उभी केली. जी त्यांच्या संघटन कौशल्याची उत्तम उदाहरण होते. याची फलश्रुती म्हणून सावित्रीबाई यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेतील वर्षाअखेरीस मुलींची संख्या ही २५ एवढी झाली. त्या काळात पहिल्याच शाळेतील मुलींची एवढी संख्या लक्षणीय म्हणावी अशी होती. त्यांची उत्कृष्ट संघटन क्षमता विशेष उल्लेखनीय आहे. एकाच वेळी अनेक शाळांचे व्यवस्थापन, शिक्षकांचे नियोजन, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शिस्त यांकडे त्यांनी काटेकोर लक्ष दिले. कोणतीही आधुनिक प्रशासकीय साधने नसताना त्यांनी शाळांचे दैनंदिन कामकाज प्रभावीपणे हाताळले, हे त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे ठळक उदाहरण आहे. सावित्रीबाई फुले या केवळ स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूतच नव्हत्या, तर त्या एक कुशल व्यवस्थापक आणि प्रभावी संघटकही होत्या. प्रतिकूल सामाजिक परिस्थितीतही त्यांनी शिक्षण व समाजसुधारणेचे कार्य यशस्वीपणे उभे केले. त्यांच्या कार्यामागे उत्तम नियोजन, संघटन, नेतृत्व आणि नैतिक मूल्यांवर आधारित व्यवस्थापन दडलेले होते.
महिलांच्या प्रश्नांकडे पाहताना सावित्रीबाई फुले यांची भूमिका अत्यंत संवेदनशील आणि व्यावहारिक होती. विधवा स्त्रिया, परित्यक्ता महिला आणि समाजाने नाकारलेल्या स्त्रियांना आधार देण्यासाठी त्यांनी आश्रयगृहे सुरू केली. या स्त्रियांना एकत्र आणून त्यांना सुरक्षित वातावरण, मानसिक आधार आणि स्वाभिमान दिला. या कार्यासाठी त्यांनी अनेक सहकाऱ्यांना जोडले आणि सेवा कार्याला संघटित स्वरूप दिले.
‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ ची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८६३ मध्ये पुण्यात केली होती. हे भारतातील पहिले केंद्र होते की, जिथे विशेषतः गरोदर विधवा आणि बलात्कार पीडित महिलांना सुरक्षित प्रसूती आणि आश्रय देण्यात येत असे. जेणेकरून त्या आणि त्यांची मुले समाजाच्या तिरस्कारापासून वाचू शकतील आणि भ्रूण हत्येसारख्या घटनांना आळा बसेल. या बालहत्या प्रतिबंधक गृहाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत सावित्रीबाईंनी समाजसेवक, दाई, डॉक्टर आणि सहानुभूती असलेल्या लोकांना एकत्र करत समाजातील गंभीर समस्यांवर संघटित उपाय करण्याचे उत्तम उदाहरण मांडले. आपल्या या बालहत्या प्रतिबंधक गृहातील एका मुलाला त्यांनी दत्तक घेऊन त्याचे संपूर्ण जबाबदारी स्वीकारली व त्यालाच आपला वारस बनविला. पुढे तोच मुलगा डॉक्टर झाला, डॉ. यशवंत ज्योतीराव फुले. प्लेग सारख्या महाभयंकर महामारी मध्ये त्यांनी फार मोलाची जबाबदारी बजावली. आपल्या उक्तीप्रमाणे कृती अशीच सावित्रीबाईंची शिकवण जी त्यांनी प्रत्यक्षात अमलात आणली.
२४ सप्टेंबर १८७३ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाच्या चळवळीत सावित्रीबाई फुले यांची भूमिका अत्यंत मोलाची होती. त्या केवळ चळवळीच्या सदस्य नव्हत्या तर तिच्या व्यवस्थापक आणि प्रेरणास्थान होत्या. सावित्रीबाईंनी स्वतः महिला विभागाचे प्रतिनिधित्व केले. ‘महिला सेवा मंडळ’ स्थापन करून सर्व जातींच्या महिलांना एकत्र आणून समानतेचा संदेश दिला. जातीभेद, अंधश्रद्धा आणि सामाजिक अन्याया विरोधात लोकांना संघटित करणे हा सत्यशोधक समाजाचा उद्देश होता. सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजात शिक्षण, सामाजिक समता आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी अग्रगण्य भूमिका बजावत अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि कर्मकांडांना विरोध केला. विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले आणि सत्यशोधक विवाहांना प्रोत्साहन दिले. सभा, चर्चासत्रे आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सामान्य लोकांना विचारप्रवृत्त केले. तसेच ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे नेले. त्यामुळे त्या सत्यशोधक चळवळीच्या खऱ्या प्रणेते ठरल्या. लोकांमध्ये आत्मभान निर्माण करणे आणि त्यांना अन्यायाविरोधात उभे करणे हे त्यांच्या संघटक कार्याचे केंद्रबिंदू होते.
सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षणतज्ज्ञ किंवा समाजसुधारकच नव्हत्या, तर संकटाच्या काळात प्रभावी व्यवस्थापन करणाऱ्या कुशल नेत्या होत्या. दुष्काळ व उपासमारीसारख्या आपत्तींच्या वेळी त्यांनी दाखवलेली व्यवस्थापन क्षमता आजही प्रेरणादायी आहे. १९ व्या शतकातील दुष्काळात समाजातील गरीब, दलित, महिला, विधवा, लहान मुले व प्राणी हे सर्वाधिक त्रस्त घटक होते, हे सावित्रीबाईंनी अचूकपणे ओळखले. समस्येची तीव्रता समजून घेऊन त्यांनी उपासमार ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून सामाजिक जबाबदारी असल्याचा दृष्टिकोन स्वीकारला. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सावित्रीबाईंनी योग्य नियोजन व संघटन केले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी अन्नदान पदयात्रा काढली. अन्नवाटप, निवारा व प्राथमिक मदतीची व्यवस्था उभी केली. उपाशी लोकांना वेळेवर अन्न मिळावे यासाठी मदत केंद्रे सुरू करण्यात आली. या केंद्रांचे संचालन शिस्तबद्ध पद्धतीने केले जात असे. मर्यादित साधनसंपत्ती असतानाही उपलब्ध अन्नधान्य, कपडे व आर्थिक मदत यांचा योग्य उपयोग करून गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यात त्या यशस्वी ठरल्या. या अन्नछत्रामध्ये १२ वर्षा खालील मुलांना दोन वेळचे जेवण मोफत मिळत असे. संकटाच्या काळात सावित्रीबाईंनी नेतृत्वगुणांचा उत्कृष्ट प्रत्यय दिला. त्या स्वतः मदतकार्यांत सहभागी होत, त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळत असे. त्यांनी सहकार्य, समन्वय व समानतेच्या तत्त्वावर काम करून समाजातील विविध घटकांना एकत्र आणले. विशेषतः महिला व मुलांसाठी सुरक्षित निवाऱ्यांची व्यवस्था करणे, आजारी लोकांची काळजी घेणे आणि त्यांना मानवी सन्मानाने वागवणे हे त्यांच्या व्यवस्थापनाचे व नेतृत्व गुणाचे वैशिष्ट्य होते. सावित्रीबाई फुले यांचे व्यवस्थापन केवळ तात्कालिक मदतीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यामागे दूरदृष्टी होती. उपासमारीचे मूळ अज्ञान, विषमता व अन्यायात आहे, हे ओळखून त्यांनी शिक्षण व सामाजिक सुधारणांवर भर दिला. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचे दुष्काळातील कार्य हे मानवी मूल्यांवर आधारित, समतावादी व प्रभावी व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण मानले जाते.
सावित्रीबाई फुले यांची संघटन शक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते. त्यांनी समाज जागृतीसाठी कविता केल्या. सावित्रीबाईंनी ‘काव्यफुले’ या काव्यसंग्रहामध्ये स्त्रिया आणि शोषितांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. विचार आणि कृती यांचा समन्वय साधून त्यांनी संघटन अधिक प्रभावी केले.
सावित्रीबाई फुले या केवळ विचारवंत नव्हत्या, तर कृतिशील संघटक होत्या. समाज परिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गुणांनी युक्त असलेल्या श्रेष्ठ संघटक होत्या. त्यांनी उभ्या केलेल्या संस्था, घडवलेले कार्यकर्ते आणि समाजमनावर रुजवलेली मूल्ये आजही मार्गदर्शक आहेत. शिक्षण, समानता आणि मानवता या मुलांवर आधारित संघटन कसे उभे करावे, याचा आदर्श सावित्रीबाई फुले यांनी भारतीय समाज मनाला दिला. दुष्काळ, पूर आणि साथीच्या रोगांच्या काळात त्यांनी समाजसेवेसाठी केलेले कार्य, स्वयंसेवकांना एकत्र करून आजारी लोकांची केलेली देखभाल, प्लेगच्या काळात केलेली सेवा, याद्वारे त्यांच्या उदार स्वभावाची प्रचिती येते. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी रुग्णांची काळजी घेतली. या सेवेतच त्यांचा मृत्यूही झाला. समाजासाठी कार्य करताना स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवण्याची वृत्ती, हीच त्यांच्या संघटक नेतृत्वाची खरी ओळख होती. त्यामुळेच भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासात श्रेष्ठ संघटक म्हणून सावित्रीबाई फुले यांची स्थान अढळ आणि प्रेरणादायी आहे.
सहा. प्रा. मेघा सुरेशराव चिमणकर,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती




