25 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home Featured News रानभाजी महोत्सव : आरोग्य, परंपरा आणि ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा

रानभाजी महोत्सव : आरोग्य, परंपरा आणि ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा

0
4

रानभाज्यांच्या जतनातून निरोगी जीवनशैली आणि ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश

पावसाळा सुरू झाला की जंगल, शेतशिवार आणि डोंगरकपारींमध्ये नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांची रेलचेल दिसून येते. एकेकाळी ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या रानभाज्या आज आधुनिक जीवनशैलीत मागे पडत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत रानभाजी महोत्सवासारखे उपक्रम केवळ पारंपरिक खाद्यसंस्कृती जपणारे नसून, आरोग्यदायी आहाराची जाणीव करून देणारे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे ठरत आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये रानभाजी महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात महिला बचत गट, उमेद अभियानातील स्वयं-सहाय्यता गट आणि महिला शेतकऱ्यांनी आयोजीत उपक्रमात सहभागी झाल्यात. गोंदिया तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवात पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आली. ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाची, स्थानिक उत्पादनांच्या बाजारपेठेची आणि रानभाज्यांच्या वाढत्या मागणीची साक्ष देणारी ठरली.

रानभाज्या म्हणजे निसर्गाची आरोग्यसंपदा रानभाज्या कोणत्याही रासायनिक खतांशिवाय आणि कीटकनाशकांशिवाय नैसर्गिकरीत्या वाढतात. त्यामुळे त्या सुरक्षित, पौष्टिक आणि आरोग्यदायी मानल्या जातात. काटवल, सुरण, तरोटा, खापरखुटी, अंबाडी, शेवगा, घोळभाजी, कोचईची पाने, केना, पातूर भाजी, मशरूम यांसारख्या रानभाज्यांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, तंतुमय घटक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, पचनक्रिया सुधारणे आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी या भाज्या उपयुक्त ठरतात.

परंपरा जपण्याची आणि नव्या पिढीला जोडण्याची गरज

आजच्या फास्टफूड संस्कृतीत अनेक मुलांना रानभाज्यांची नावेही माहिती नाहीत. पूर्वी आपल्या पूर्वजांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असलेल्या या भाज्या हळूहळू विस्मृतीत जात आहेत. त्यामुळे रानभाजी महोत्सव नव्या पिढीला आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख करून देतो. या महोत्सवातून रानभाज्यांचे पौष्टिक मूल्य, त्यापासून तयार होणारे विविध पदार्थ आणि त्यांचे औषधी गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचतात.

महिला बचत गटांसाठी उत्पन्नाचे साधन

रानभाजी महोत्सव हा केवळ प्रदर्शनाचा कार्यक्रम नसून ग्रामीण महिलांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग ठरत आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रानभाज्यांचे मूल्यवर्धन करून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार केल्यास महिलांना रोजगाराच्या नव्या संधी यानिमित्त उपलब्ध होऊ शकतात. योग्य प्रक्रिया, पॅकेजिंग आणि बाजारपेठ उपलब्ध झाल्यास रानभाज्यांवर आधारित लघुउद्योग मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकतात.

रानभाजी महोत्सव का आवश्यक आहे? 

रानभाजी महोत्सवामुळे लोकांमध्ये आरोग्यदायी आहाराबाबत जागरूकता निर्माण होते, पारंपरिक अन्नसंस्कृतीचे जतन होते, स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित होते आणि ग्रामीण महिलांना आर्थिक संधी उपलब्ध होतात. तसेच रानभाज्यांचे संवर्धन, त्यावरील संशोधन आणि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन मिळते. अशा उपक्रमांमुळे “आरोग्यदायी आहार, समृद्ध शेतकरी आणि सक्षम महिला” हा उद्देश प्रत्यक्षात साकार होण्यास मदत होते.

रानभाज्या या केवळ पावसाळ्यात मिळणाऱ्या भाज्या नाहीत, तर त्या आपल्या आरोग्याचा, संस्कृतीचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अमूल्य ठेवा आहेत. त्यामुळे अशा महोत्सवांचे आयोजन वर्षानुवर्षे अधिक व्यापक स्वरूपात होणे ही काळाची गरज आहे. यामुळे निरोगी समाज, स्वावलंबी महिला आणि समृद्ध ग्रामीण अर्थव्यवस्था घडविण्याच्या दिशेने निश्चितच मोठे पाऊल उचलले जाईल.

–  अंजु कांबळे निमसरकर,     जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया