
*औषधोपचाराने सिकलसेल नियंत्रित*
गोंदिया, दि.15 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान’ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जिल्हावासियांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
सिकलसेल ॲनिमिया हा गंभीर अनुवांशिक रक्ताचा विकार आहे. यावर नियंत्रण मिळवणे ही केवळ शासनाचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. या आजाराचे वेळेवर निदान झाल्यास तो योग्यरितीने व्यवस्थापित करता येतो, ज्यामुळे रुग्णाचे आयुष्य सुसह्य होऊ शकते.
असे राबविण्यात येणार अरुणोदय सिकलसेल अभियान
अभियानाचा कालावधी :- 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026.
लक्ष्य गट :- 0 ते 40 वयोगटातील सर्व नागरिकांची या मोहिमेत तपासणी केली जाणार आहे.
तपासणी व उपचार :- संशयित व्यक्तींची रक्ताची चाचणी केली जाईल. ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील, त्यांच्या पुढील चाचण्या करून त्यांना एक विशेष कार्ड देण्यात येईल.
मोफत औषधोपचार :- सिकलसेलसाठी अत्यंत प्रभावी मानले जाणारे ‘हायड्रॉक्सी युरिया’ (Hydroxyurea) हे औषध प्रशासनामार्फत रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आवाहन केले आहे की, “सिकलसेल हा आजार मुळापासून नष्ट करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून, नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन आपली व आपल्या मुलांची तपासणी करून घ्यावी. योग्य वेळी उपचार घेतल्यास या आजाराचे व्यवस्थापन करणे सोपे होते.”गोंदिया जिल्हा प्रशासनाने या मोहिमेसाठी आरोग्य विभागाच्या चमू तैनात केल्या असून, प्रत्येक गावात आणि शहरात ही तपासणी उपलब्ध असणार आहे.




