35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय गोंदिया नगरपरिषद उपाध्यक्षपदी भाजपचे संतोष पटले,स्विकृत सदस्यांचीही निवड

गोंदिया नगरपरिषद उपाध्यक्षपदी भाजपचे संतोष पटले,स्विकृत सदस्यांचीही निवड

0
469

blank

गोंदिया,दि.१५ ः गोंदिया नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी नगर परिषदेत आज गुरुवारी (ता. १५) बोलावलेल्या सभेत उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी भाजप राष्ट्रवादी युतीचे भाजपचे नगरसेवक संतोष पटले यांची वर्णी लागली.उपाध्यक्षपदाकरीता भाजपने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डाॅ.प्रशांत कटरे यांच्यामुळे भाजप उमेदवाराच्या झालेल्या पराभवाच्या धसक्याने पोवार समाजाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली.
विशेष म्हणजे सलग तिसर्यांदा निवडुन येऊनही मैथुलाबाई बिसेन यांना उपाध्यक्षपद आपल्याकडे खेचण्यात अपयश आले.स्विकृतच्या सदस्यामध्ये भाजपने रेलटोली मंडळाला झुकते माप देत बहुजनवाद जोपासण्याचे प्रयत्न केले.मात्र काँग्रेसने स्विकृत सदस्य नेमतांना बहुजनवादाला फाट्यावर मारत नगराध्यक्ष ओबीसी असला तरी सत्तेचे केंद्र आम्हीच राहणार हे स्विकृत सदस्याच्या निवडीवरुन दाखवून दिले आहे.
गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून नगर परिषद आणि नगर पंचायतीची निवडणूक रखडली होती. अखेर डिसेंबर २०२५ मध्ये मतदान घेऊन २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. गोंदिया नगर पालिकेत एकूण ४४ नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाकरिता निवडणूक झाली. त्यात कॉंग्रेसचे १४, भाजप १८, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजित पवार) पाच, अपक्ष तीन आणि बसपचे दोन नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्ष म्हणून कॉंग्रेसचे सचिन शेंडे निवडून आले. नगर परिषदेत ओढताण करूनदेखील कॉंग्रेसला सत्ता स्थापन करता येत नव्हती. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसने एकत्र येत उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान केले. त्यात भाजपचे संतोष पटले यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली. तसेच भाजपने जितेंद्र (बंटी) पंचबुद्धे आणि घनशाम पानतवणे, कॉंग्रेसने प्रफुल्ल अग्रवाल आणि अजय अग्रवाल, तर राष्ट्रवादी काॅंग्रेसने लोकेश(कल्लू) यादव यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली. भाजपमध्ये स्वीकृत सदस्य आणि उपाध्यक्षपदाच्या नावावरून १४ जानेवारी रोजी आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरापुढे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत हरकत घेतली होती. मात्र, नाराजी दूर सारत अखेर गुरुवारी नावांची घोषणा करण्यात आली. दरम्यान, सभेत आमदार विनोद अग्रवाल, भाजपच्या जिल्हाध्यक्ष सीता रहांगडाले, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
उल्लेखनीय म्हणजे, तिरोडा नगर परिषदेत भाजपच्या सहा नगरसेवकांसह नगराध्यक्ष निवडून आले. सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादीकडे १२ नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राजेश गुणेरिया यांची उपाध्यक्ष म्हणून निवड होण्याची अधिक शक्यता आहे. मात्र, अद्यापही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर केले नाही. गोरेगाव नगर पंचायतीच्या स्वीकृत सदस्य निवडीवेळी झालेल्या गोंधळाची येथे पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता सावध पवित्रा घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

blank