तिरोडा (चित्रा कापसे):राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र प्रदेशाचे राज्यप्रमुख पंडित कांबळे यांच्या मान्यतेने सुरेश प्रकाश गौधर्य यांची गोंदिया जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सुरेश गौधर्य यांनी पक्षासाठी केलेले दीर्घकालीन कार्य आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून समाजातील वंचित व शोषित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणे आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत मजबूत करण्याचे मुख्य उद्दिष्ट त्यांच्यासमोर असणार आहे.
नियुक्तीपत्र प्रदान करताना जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे यांनी पक्षाची ध्येय-धोरणे आणि विचारधारा जिल्ह्यातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत सामाजिक समता आणि न्यायासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार गौधर्य यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला युवक जिल्हाध्यक्ष गणेश पारधी, महिला जिल्हा उपाध्यक्ष वैशालीताई तुरकर, गोरेगाव तालुका अध्यक्ष दशरथ बिसेन आणि सुरेश तुरकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश गौधर्य यांच्या नियुक्तीबद्दल पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





