30.6 C
Gondiā
Wednesday, September 16, 2026
Home विदर्भ मृतकांच्या नातेवाईकांना तत्काळ आर्थिक मदत देऊन शासकीय नोकरीत समावेश करा

मृतकांच्या नातेवाईकांना तत्काळ आर्थिक मदत देऊन शासकीय नोकरीत समावेश करा

0
168

_ पोवार समाजाची निवेदनातून शासनाकडे मागणी
गोंदिया_ जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पोवार समाजाच्या तिघांचा मृत्यू झाला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या वाढत्या घटनांवर तत्काळ प्रतिबंध लावून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना तात्काळ आर्थिक मदत देवून कुटुंबातील एका व्यक्तीचा शासकीय नोकरीत समावेश करावा, अशी मागणी आज १५ जानेवारी रोजी निवासी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून पोवार समाजाच्या वतीने करण्यात आली.
जिल्ह्यात मानव व वन्य प्राण्यांमध्ये दिवसेंदिवस संघर्ष वाढत चालला आहे. मागील तीन महिन्यांच्या आत विविध तीन घटनांमध्ये पोवार समाजातील तिघांना जीव गमवावा लागला. पहिल्या घटनेत तिरोडा तालुक्यातील इंदोरा बूज/निम येथे रुचिका रहांगडाले (10) ही मुलगी शेतात वडिलांसोबत गेली असता बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवून जीव घेतला होता. दुसऱ्या घटनेत मागील आठवड्यात गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव येथील निलकंठ आसाराम तुरकर हे शेतकरी आपल्या शेतात जात असताना रानगव्याने त्यांच्यावर हल्ला करून पोटात शिंगे खुपसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या सर्व घटना ताज्या असतानाच या आठवड्यात पुन्हा तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव खडकी येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंगणात चुलीजवळ बसलेल्या हियांश शिवशंकर रहांगडाले (4) या बालकाच्या नरडीचा घोट घेतला. वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्या तरी प्रशासनाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना करण्यात येत नसल्याने जन सामान्यांमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशा घटनांवर तात्काळ प्रतिबंध घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या, मृतकांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी या मागण्यांचे निवेदन शासनाला आज 15 जानेवारी पोवार समाजाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून निवासी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आले. निवेदन देतेवेळी पवार प्रगतिशील मंचचे अध्यक्ष यू. टी. बिसेन, राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेचे संघटन सचिव राजकुमार (पप्पू) पटले, पवार प्रगतिशील मंच सचिव बंटी बोपचे, राष्ट्रीय क्षत्रिय महासभेचे दिलीप पारधी, भागचंद्र रहांगडाले,सुरेश पटले, पंकज पटेल, राज रहांगडाले,बिट्टू बीसेन,छनेश चव्हाण, देवचंद बीसेन, लोकेश रहांगडाले आदी उपस्थित होते.