25.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ 35 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जुळले मैत्रीचे सूर; पन्नाशीच्या उंबरठ्यावर विसरले जगाचे भान

35 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जुळले मैत्रीचे सूर; पन्नाशीच्या उंबरठ्यावर विसरले जगाचे भान

0
58
काळाच्या पडद्याआड गेलेले ‘ते’ सोनेरी दिवस पुन्हा अवतरले! कोराडीच्या माजी विद्यार्थ्यांचा भावूक स्नेहमेळा
नागपूर: शाळेच्या जुन्या भिंती, तो काळपट फळा, मधल्या सुट्टीत होणारी डब्यांची पळवापळवी आणि शिक्षकांच्या नकळत केलेली ती निरागस मस्ती… काळाच्या ओघात हे सर्व कुठेतरी मागे सुटलं होतं. मात्र, तब्बल 35 वर्षांनंतर जेव्हा विद्या मंदिर कोराडी येथील 1990 च्या बॅचचे सवंगडी पुन्हा एकमेकांसमोर आले, तेव्हा काळाची सर्व बंधने गळून पडली. वयाची पन्नाशी गाठलेल्या या ‘तरुणांनी’ जेव्हा एकमेकांना कडकडून मिठी मारली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या आनंदाश्रूंनी 35 वर्षांचा विरह एका क्षणात पुसून टाकला.
नाते जपले, अंतरे मिटली!:
नागपूर जवळील ‘आनंदमेळा’ या निसर्गरम्य ठिकाणी हा अनुपम सोहळा पार पडला. १९९० मध्ये दहावीची परीक्षा देऊन आयुष्याच्या विविध वाटांवर पांगलेले हे मित्र आज साडेतीन दशकांनंतर एकत्र आले होते. विशेष म्हणजे, केवळ नागपूरच नव्हे, तर चंद्रपूर, वर्धा, अमरावती, पुणे, मुंबई आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून मित्र-मैत्रिणी आपली सर्व कामे बाजूला सारून या भेटीसाठी धावून आले होते. चेहऱ्यावर पडलेल्या वयाच्या सुरकुत्या आणि केसांवर आलेली चांदी, यापलीकडे जाऊन प्रत्येकाला आपल्या जुन्या मित्राच्या डोळ्यांत तोच ‘शाळकरी मित्र’ दिसत होता.
यशाची शिखरे पादाक्रांत, पण मनात अजूनही तोच विद्यार्थी:
आज या मित्रमंडळींमध्ये कुणी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन आहे, तर कुणी वरिष्ठ शासकीय अधिकारी. कुणी नामवंत डॉक्टर आहे, तर कुणी अभियंता, प्राध्यापक आणि यशस्वी उद्योजक. समाजाच्या दृष्टीने ही सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वे असली, तरी ‘आनंदमेळा’च्या या प्रांगणात शिरताना प्रत्येकाने आपल्या पदाची आणि प्रतिष्ठेची झूल बाहेरच उतरवून ठेवली होती. तिथे कुणी ‘साहेब’ नव्हतं की कुणी ‘डॉक्टर’, तिथे होते ते फक्त एकमेकांचे पाय खेचणारे बालपणीचे ‘लाडके मित्र’.
उकडलेली बोरं आणि आठवणींचा दरवळ:
कार्यक्रमात केवळ गप्पाच रंगल्या नाहीत, तर बालपण पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न झाला. उकडलेली बोरं, पारंपरिक वाद्ये आणि त्या काळातील संगीताने वातावरणात एक वेगळीच मोहिनी घातली होती. जुन्या गाण्यांवर ठेका धरताना ही पन्नाशीची ‘मंडळी’ पुन्हा एकदा आपल्या शालेय स्नेहसंमेलनाच्या आठवणीत रमली. कोरोनासारख्या जागतिक महामारीने दिलेल्या मानसिक जखमांवर या मैत्रीच्या भेटीने मायेची फुंकर घातली. आयुष्यातील संघर्षाचा थकवा या एका भेटीने दूर झाला, अशी भावना अनेकांनी कंठ दाटून आल्यावर व्यक्त केली.
अनुपस्थित मित्रांची आठवण आणि कृतज्ञता:
या स्नेहमेळाव्यात डॉ. शितल बांबल-चौधरी, प्रशांत जाजू, जयश्री देशमुख-वाघमारे, रवी गुळरांधे, प्रसन्ना महाशब्दे, डॉ. अंजली कडू-कदम, गोविंद हिरडे, नरेंद्र झोड, जयंत सातव, सोनिया दुर्शेलवार-गर्गेलवार, सागर सिंह, जयंत जुमडे, माधुरी चाफेकर-नाडेकर, रमेश सावकरकर, पुनम झांब्रे-बोंडे, किशोर मुळे, अतुल पिंपळापुरे, नंदू बारई, अमोल मावकर, प्रविण मानवटकर, माधुरी साठवणे, डॉ. शमा खान आणि योगेश विटनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी केवळ उपस्थित मित्रच नव्हे, तर जे मित्र आज आपल्यात नाहीत किंवा जे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत, त्यांच्या आठवणीने सर्वांचे डोळे पाणावले. आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या शिक्षकांप्रतीही सर्वांनी अत्यंत कृतज्ञतापूर्वक आदर व्यक्त केला.
‘अभी तो पार्टी शुरू हुई है’: एका नव्या प्रवासाची नांदी:
दिवस मावळला, घरी परतण्याची वेळ झाली, पण पाय निघत नव्हते. निरोप घेताना प्रत्येकाचं मन भरून आलं होतं. मात्र, ही भेट म्हणजे शेवट नसून आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगची दिमाखदार सुरुवात आहे, असा निश्चय प्रत्येकाने केला. ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या जिद्दीने आणि बालपणाच्या आठवणींची अमूल्य शिदोरी हृदयाशी जपून, हे सर्व सवंगडी पुन्हा एकदा आयुष्याच्या रणांगणावर नव्या उमेदीने लढण्यासाठी सज्ज होऊन परतले.

blank