छत्रपती संभाजीनगर: २१ जानेवारी –महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे आणि डायट छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक ॲनिमेशन स्पर्धेत गुणवत्तेचा खून झाल्याचा खळबळजनक आरोप अन्यायग्रस्त तंत्रस्नेही शिक्षकांनी केला आहे. स्पर्धेच्या निकालात झालेला प्रचंड विलंब आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
नेमके प्रकरण काय?
शिक्षकांमधील तांत्रिक कौशल्याला वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी राज्यातील शेकडो तंत्रस्नेही शिक्षकांनी महिना-महिना रात्र जागून उच्च दर्जाचे २डी (2D) आणि ३डी (3D) ॲनिमेशन व्हिडिओ तयार केले होते. मात्र, निकाल जाहीर करण्याच्या दिवशी मोठी नाट्यमय घडामोड घडली. जो निकाल शनिवारी जाहीर होणे अपेक्षित होते, तो तांत्रिक कारणांचे नाव सांगून वारंवार पुढे ढकलण्यात आला. अखेर दोन दिवसांच्या विलंबानंतर सोमवारी निकाल जाहीर झाला, मात्र या यादीत गुणवंत शिक्षकांना डावलून ‘वशिलेबाजी’चा उघड खेळ खेळला गेल्याचा दावा शिक्षकांनी केला आहे.
वशिलेबाजीचे गंभीर आरोप:
अन्यायग्रस्त शिक्षकांनी पुराव्यानिशी खालील गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत:
“१.नियमांची पायमल्ली: ज्या व्हिडिओंवर इतर संस्थांचे ‘लोगो’ होते किंवा जे व्हिडिओ मूळ (Original) नव्हते, अशा सादरीकरणांना जाणीवपूर्वक ‘टॉप १०’ मध्ये स्थान देण्यात आले.
२. गुणांकनात घोळ: तांत्रिकदृष्ट्या प्रगत असलेल्या २डी-३डी ॲनिमेशनला डावलून साध्या व्हिडिओंना झुकते माप देण्यात आले.
३. सादरीकरणाची समस्या: सर्वांच्या समोर सादरीकरण करायला न लावता एकेक शिक्षकांना दुस-या खोलीत नेऊन सादरीकरण करायला लावले.
४. पारदर्शकतेचा अभाव: निकाल दोन दिवस का रखडला? त्या दोन दिवसांत कोणाच्या ‘ओळखीच्या’ लोकांसाठी निकाल बदलण्यात आला? असा सवाल शिक्षक विचारत आहेत.
शिक्षकांचा एल्गार:
विविध जिल्हे व विभागातून आलेल्या राज्यातील अनेक शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आम्ही रात्रंदिवस एक करून दर्जेदार साहित्य निर्माण केले, पण निवडीच्या वेळी गुणवत्तेपेक्षा ‘ओळखी’ला महत्त्व दिले गेले. हे तंत्रस्नेही शिक्षकांच्या उत्साहावर विरजण घालणारे आहे,” अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
पुनर्मूल्यांकनाची मागणी:
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण निकालाचे तज्ज्ञ समितीमार्फत ‘पुनर्मूल्यांकन’ (Re-evaluation) करण्यात यावे, अशी मागणी एससीईआरटी (SCERT) पुणे आणि शिक्षण आयुक्तांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. जर न्याय मिळाला नाही, तर आगामी शैक्षणिक उपक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही या तंत्रस्नेही शिक्षकांनी दिला आहे.





