नागपूर : जगद्गुरू श्रीदेवनाथ वैदिक विज्ञान व अनुसंधान संस्था (JSDIVSR), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व एल. ए. डी. अँड श्रीमती आर. पी. कॉलेज फॉर वुमेन्स यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय ज्ञान परंपरा” या विषयावरील दोन दिवसीय आचार्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, जगद्गुरू श्रीदेवनाथ वैदिक विज्ञान व अनुसंधान संस्थेचे बोर्ड मेंबर अनुराग देशपांडे, श्रीदेवनाथ संस्थेच्या भारतीय ज्ञान केंद्राचे संचालक आचार्य श्रेयस कुऱ्हेकर, वुमन्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. नंदा राठी, वुमन्स एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. हर्षा झरिया, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पूजा पाठक यांची उपस्थिती होती. कार्यशाळेचे उद्घाटन करून माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी मार्गदर्शन करताना सर्व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये भारतीय ज्ञान परंपरा (आयकेएस) अभ्यासक्रमाच्या विकासासाठी अभ्यासकांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले. आपल्या प्रदीर्घ अनुभवातून विविध उदाहरणे देत अध्यापन करताना निःस्वार्थ मूल्यांची रुजवणूक होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी आयकेएसच्या सार्वत्रिक उपयोगातून शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्या डॉ. पूजा पाठक यांनी स्वागतपर भाषणात कार्यशाळेचे महत्त्व सांगितले. तसेच जगद्गुरू श्रीदेवनाथ वैदिक विज्ञान व अनुसंधान संस्थेच्या (JSDIVSR) कार्याचे विशेष कौतुक केले. वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. नंदा राठी यांनी आपल्या भाषणात भारतीय ज्ञान परंपरा ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असली तरी आधुनिक शिक्षण व्यवस्थेत तिचा समावेश कमी प्रमाणात झाल्याचे नमूद केले. शिक्षकांना दैनंदिन अभ्यासक्रमात स्वदेशी ज्ञानाचा समावेश करण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. जगद्गुरू श्रीदेवनाथ वैदिक विज्ञान व अनुसंधान संस्थेचे बोर्ड मेंबर श्री. अनुराग देशपांडे यांनी कार्यशाळेच्या उपयुक्ततेवर भाष्य करत आयकेएस हे संपूर्ण व समग्र ज्ञान असल्याचे स्पष्ट केले व आज हे ज्ञान महत्त्वपूर्ण असून विद्यार्थांपर्यंत हे कसे न्यावे या वर विचार व्हावा हे सांगितले. कार्यशाळेला मिशन फॉर डेव्हलपमेंट अँड डिव्हिनिटी ट्रस्ट नागपूरचे सचिव प्रकाश कावळे, कोषाध्यक्ष निरंजन देशकर यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
द्वितीय दिवशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेकनॉलॉजी चे प्राध्यापक व भारतीय ज्ञान परंपरेचे विशेषज्ञ डॉ. हर्षा सिम्हा यांनी “मंदिर स्थापत्य कला” या विषयावर वर दोन सत्र घेतले व याचे महत्त्व स्पष्ट केले. समारोपीय सत्रामध्ये प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आयआयएल संचालक डॉ. प्रकाश इटनकर उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमला शुभेच्छा देऊन भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आचार्यांची भूमिका स्पष्ट केली. विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे आयक्यूएसी संचालक डॉ. नंदकिशोर करडे व जगद्गुरू श्रीदेवनाथ संस्थेचे मार्गदर्शक मंडळाचे सदस्य डॉ. प्रफुल्ल साबळे उपस्थित होते.





