■ २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा गावक-यांचा इशारा .
■ कार्यवाही होत नसल्याने गावक-यांचा संताप.
देवरी,दि.२३: प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व धरणे आंदोलन करूनही गावातील बिअर बारवर कारवाई होत नसल्याने संतापलेल्या देवरी तालुक्यातील धोबाटोला (गट ग्रामपंचायत उचेपूर) येथील गावकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घेतली आहे. येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला गुरूवारी (दि.२२ जानेवारी) रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.
देवरी तालुक्यातील धोबाटोला येथील गावक-यांनी ‘मे. अरमान बिअर बार तथा रेस्टॉरंट’ याला तीव्र विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या बारची अनुज्ञप्ती (परवाना) अवैधरित्या जारी करण्यात आला आहे. या विरोधात ग्रामस्थ गेल्या २७ नोव्हेंबर २०२५ पासून सातत्याने धरणे आंदोलन करीत आहेत. मात्र, प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ग्रामस्थांनी यापूर्वी गोंदियाचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक,देवरीचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना अनेकदा निवेदने दिली आहेत. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केले, अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, पण आमची मागणी मान्य झाली नाही. या बारमुळे गावातील शांतता आणि सामाजिक वातावरण बिघडत आहे. अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून आता ग्रामस्थांनी आपला लढा अधिक तीव्र केला आहे.
बारचा परवाना त्वरित रद्द करा.–
जर सदर बारचा परवाना त्वरित रद्द केला नाही, तर २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करू, असा स्पष्ट इशारा धोबाटोला(उचेपूर) येथील ग्रामस्थानी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह गोंदिय चे जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक यांना निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर सेवंताबाई सर्पा, फुलबासन मडावी, मंगनीबाई नेताम, ज्योतीबाई हलामी, शारदा बघवा, कलेश्वरी घिवकुवार, दुरपतीबाई डेहेलिया, भगवंताबाई घिवकुवार यांच्यासह गावातील शंभरच्या जवळपास गावक-यांच्या स्वाक्षऱ्या आणि अंगठे आहेत.





