23.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ कर्जमुक्तीसाठी बायोमेट्रिक केवायसी अनिवार्य; शेतकऱ्यांनी तत्काळ प्रक्रिया पूर्ण करावी: जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कर्जमुक्तीसाठी बायोमेट्रिक केवायसी अनिवार्य; शेतकऱ्यांनी तत्काळ प्रक्रिया पूर्ण करावी: जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0
10

गोंदिया, दि. 24 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्य शासनाने आधार प्रमाणीकरण (KYC) प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले असून, आता कर्जमाफीसाठी बायोमेट्रिक KYC अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन शेतकऱ्यांना तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले.
बैठकीत सांगण्यात आले की, कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण (KYC) आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक असून, पूर्वीप्रमाणे OTP द्वारे होणारे प्रमाणीकरण आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून बायोमेट्रिक पद्धतीने (बोटांचे ठसे/आयरिस) KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी पत्की यांनी स्पष्ट केले की, या नव्या पद्धतीमुळे लाभार्थ्यांची अचूक ओळख पटेल आणि संपूर्ण कर्जमाफी प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह होईल. पात्र शेतकऱ्यांची यादी संगणक प्रणालीवर पडताळणीनंतर उपलब्ध केली जाणार असून, कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
KYC प्रक्रिया कुठे करावी?
शेतकऱ्यांना ही प्रक्रिया जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँक शाखेत पूर्ण करता येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड सोबत नेणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन :
आपल्या नावाचा समावेश पात्र यादीत आहे का ते तपासा. आधार कार्ड सोबत घेऊन सेवा केंद्र/बँकेत भेट द्या. बायोमेट्रिक KYC प्रक्रिया त्वरित पूर्ण करा. प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, OTP द्वारे KYC आता होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता स्वतः उपस्थित राहून बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
अ‍ॅग्रीस्टॅकचे लाभ
केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेला अ‍ॅग्रीस्टॅक (AgriStack) हा कृषी क्षेत्रात मोठा बदल घडवणारा डिजिटल उपक्रम आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत असून शेती अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक होत आहे.
अ‍ॅग्रीस्टॅकचे प्रमुख लाभ
सरकारी योजनांचा थेट लाभ. प्रधानमंत्री किसान योजनेसारख्या योजनांचे थेट लाभ हस्तांतरण (DBT) सुलभ होते.
पीक विमा व नुकसान भरपाईची अचूक नोंदणी होते. डिजिटल पद्धतीने जलद कर्ज वितरण शक्य होते.
अचूक ओळख : फार्मर आयडी
प्रत्येक शेतकऱ्याला युनिक फार्मर आयडी दिला जातो. आधार क्रमांक व जमिनीची माहिती जोडल्याने ओळख स्पष्ट होते. योजनांचा लाभ मिळताना गोंधळ व विलंब कमी होतो. आधुनिक तांत्रिक सहाय्य. हवामानाची अचूक माहिती व अंदाज मिळतो. माती आरोग्य तपासणी व योग्य पीक सल्ला मिळतो. पीक पेरणी व उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन उपलब्ध.
पारदर्शक व सोपी प्रक्रिया
सर्व योजना व सेवांची एकत्रित माहिती मिळते. पीक कर्ज, MSP व इतर योजनांमध्ये अडथळे कमी होतात. शेतकऱ्यांना सुलभ व जलद सेवा मिळते.
उत्पादन व उत्पन्न वाढ
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनक्षमता वाढते. योग्य नियोजनामुळे खर्च कमी व नफा वाढतो. सरकारी मदतीचा योग्य उपयोग करून शेती अधिक फायदेशीर होते.
अ‍ॅग्रीस्टॅक हा शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल क्रांती असून, यामुळे शेती अधिक स्मार्ट, पारदर्शक आणि उत्पन्नवाढीची संधी देणारी बनत आहे. प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आयडी तयार करून या सुविधांचा लाभ घ्यावा. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा.

blank