33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News अजित पवारांना शासकीय इतमामात दिला जाणार निरोप, पार्थिवावर कुठे होणार अंत्यसंस्कार?

अजित पवारांना शासकीय इतमामात दिला जाणार निरोप, पार्थिवावर कुठे होणार अंत्यसंस्कार?

0
51

blank

अजित पवारांच्या निधनानंतर असंख्य कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. आता त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन कुठे करता येणार आणि त्यांचे अंत्यसंस्कार कुठे होणार याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. आज बुधवारी संध्याकाळी ४ वाजल्यापासून त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान, विद्या नगरी चौक येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आज रात्री उशिरापर्यंत नागरिकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल.

यानंतर गुरुवारी सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा विद्या प्रतिष्ठान चौक आणि भिगवण रोड सेवा रस्त्यावरून मार्गक्रमण करेल. यानंतर सकाळी ११ च्या दरम्यान विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी सध्या बारामतीमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासकीय आणि कौटुंबिक पातळीवर वेगाने तयारी सुरू आहे. एकीकडे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात नियोजनाची तयारी केली जात असताना, दुसरीकडे अजित दादांचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीतही हालचालींना वेग आला आहे. काटेवाडीतील त्यांच्या निवासस्थानाशेजारील स्वतःच्या शेतात संपूर्ण जमीन नांगरून आणि सपाटीकरण करून जागा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अंत्यसंस्कारासाठी नेमकी कोणती जागा निवडायची याबाबतचा अंतिम निर्णय पवार कुटुंब घेणार आहे.

अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच लोकसभेत दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या निधनामुळे बारामती आणि बीड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून सर्व सरकारी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

घड्याळामुळे ओळख पटली

अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कारणीभूत ठरलं ते त्यांच्या मनगटावरचं घड्याळ. राजकीय क्षेत्राचा विचार केला तर घड्याळ हेच चिन्ह घेऊन राष्ट्रवादीचा पर्यायाने अजित पवारांचा प्रवास, त्यांची राजकीय कारकीर्द चढत्या क्रमाने पुढे जात राहिली. पुढे राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाल्यानंतरही घड्याळ हे चिन्ह त्यांच्याकडेच राहिलं आणि आज मनगटावरच्या घड्याळाने त्यांच्या मृतदेहाची शेवटची ओळख पटणं, हा नियतीचा क्रूर खेळ म्हणावा की आणखी काही हेच कळत नाही.

अजितदादा_पवार यांचा अल्प परिचय.
जन्म.२२ जुलै १९५९
परिचितांमध्ये आणि कार्यकर्त्यांत त्यांची ओळख ” अजित दादा’ म्हणूनच राहिली. दिवसाचे १६-१७ तास सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आव्हान लीलया पेलणारे अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपणारी तलवारच होती.
भल्या पहाटे कामाला सुरुवात करणारा, फाईल्सवर थेट निर्णय घेणारा आणि कठोर प्रशासक अशी त्यांची प्रतिमा होती.
सातत्याने गेली ३ दशके महाराष्ट्रासारख्या राज्याच्या राजकीय-सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या नेतृत्वाकडे असलेली सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी थक्क करणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार नवमहाराष्ट्राचे शिल्पकार राहिले.
वक्तशीरपणा, लोकांसाठी सतत उपलब्ध असणे, अडी-अडचणी सोडवणे, प्रश्न मार्गी लावणे, विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी अभ्यासपूर्ण चर्चा करून निर्णय घेणे आणि विकास साधताना कलात्मक दृष्टी जोपासण्याची वृत्ती शरद पवार साहेबांची कारकीर्द जवळून पाहिल्यामुळेच अजित पवार यांच्या अंगी बाणवली गेली. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच पुढील २५-३० वर्षांचा विचार करून विकास करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न राहिला.
अजित पवार यांची आई देवळाली प्रवरा येथील कदम घराण्यातील होत्या, तर शरद पवारांचे मोठे भाऊ असलेले अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरीला होते. अजित पवार यांचे आजोबा गोविंदराव पवार हे बारामती सहकारी खरेदी विक्री संघामध्ये नोकरीला होते तर आजी शारदाबाई या काटेवाडीतील शेती सांभाळात असत. शरद पवार त्यांच्या भाषणातून नेहमी त्यांच्या आईचा म्हणजेच शारदाबाईंचा उल्लेख करत. तर याच माऊलीचे संस्कार अजित पवारांनाही मिळाले होते. सर्व सामान्य कुटुंबात वाढलेल्या अजित दादांचे आयुष्य सुरूवातीला अत्यंत सामान्य आणि हाल अपेष्टांमधून गेले. त्यामुळे मानवी जीवनातील दुःख, दारिद्य, अडचणी यांची पुरेपुर जाण अजित पवार यांना कायम होती. अजित पवारांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथे झाले. त्यानंतर ते मुंबईत त्यांचे काका शरद पवार यांच्याकडे दहावीनंतरच्या शिक्षणासाठी आले. तोपर्यंत शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीने चांगलाच वेग घेतला होता. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करून दादांनी पुन्हा बारामती गाठली या कर्मभूतीतील सहकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. थोड्याच वेळात अजित पवारांनी या क्षेत्रात चांगली पकड घेतली. यानंतर १९९१ ला त्यांची पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्याचवर्षी ते विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडूनही आले. या विजयानंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्री झाले. त्या बरोबरच त्यांनी एकदा बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस १९९९ मध्ये सत्तेत आल्यानंतर अल्पावधीत सरकार आणि संघटना या दोन्ही ठिकाणी अजितदादांनी आपला प्रभाव वाढवला. अजितदादांनी २०१४ पर्यंत राज्यात विविध खाती सांभाळली. प्रशासनावर वचक असलेला नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. पक्ष कार्यकर्त्यांना त्यांची कारभाराची कार्यक्षम शैली आकर्षित करते. पाच वेळा बारामतीचे आमदार म्हणून विक्रमी मतांनी विजयी होणाऱ्या अजित पवार यांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलला. राज्यातून २०१४ नंतर पक्षाची सत्ता गेल्यानंतर अजितदादा स्वस्थ बसलेले नव्हते. ‘राजकीय जीवनात चढउतार होत असतात. सत्तेचा कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नसतो. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसायचे नाही,’ असा त्यांचा कार्यकर्त्यांना सांगावा असे. सरकार असो अथवा नसो अजित पवारांनी त्यांच्या नावाचा दबदबा राजकीय वर्तुळात कायम ठेवला आहे. शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्यात आणि सुप्रिया सुळेंमध्ये स्पर्धा असली तरी अजित पवार ते दाखवून देत नाहीत. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अजित पवारांनी आपल्या कामाची वेगळी छाप सोडली होती. दारूबंदीच्या निर्णयाला पाठिंबा, आधुनिक शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालयांना प्रोत्साहन, नगर-विकास, पंचायत राज व्यवस्थेत सर्व घटकांना सामावून घेणं, शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नाची मांडणी करणं या सगळ्यांत अजित पवारांचं योगदान महत्वपूर्ण राहिलं राहिले. राज्यात कोरोनाचं संकट असताना अजित पवारांनी पायाला भिंगरी लावून परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले. राज्याच्या मुख्यमंत्री पदाने अजित पवारांना कायम हुलकावणीच दिली. तगडी खाती पदरात पाडून घेताना राष्ट्रवादी पक्षाने १५ वर्षं उपमुख्यमंत्रीपदच आपल्या वाट्याला घेतलं. पण सत्ता-संघर्षात राष्ट्रवादीने स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवली होती हे मात्र नक्की होते.
यांचे आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान दुर्घटनेत मृत्यु झाला.
अजित दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

blank